महाराष्ट्राच्या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी दक्षिण कोरियाशी सामंजस्य करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण कोरीयाच्या दौ-यावर
मुंबई : महाराष्ट्रात उभारण्यात येणाऱ्या विविध पायाभूत सुविधांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी दक्षिण कोरियासोबत मंगळवारी सेऊल येथे सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण कोरियाच्या भूमी, पायाभूत सुविधा आणि परिवहन मंत्री किम ह्यू मी यांच्याशी विविध प्रकल्पांच्या उभारणीबाबत विस्ताराने चर्चा केली. यासोबतच नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉरच्या उभारणीसाठी दक्षिण कोरियाने सहकार्य करण्यास उत्सुकता दर्शविली आहे.
दक्षिण कोरियाच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचे मंगळवारी सेऊल येथे आगमन झाले. त्यानंतर श्रीमती किम ह्यू मी यांच्याशी या शिष्टमंडळाने संवाद साधला. महाराष्ट्रात उभारण्यात येत असलेल्या विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी किम यांना माहिती दिली. औद्योगिक विकासातही महाराष्ट्र अग्रेसर असून भारतात झालेल्या परकीय गुंतवणुकीपैकी 50 टक्के गुंतवणूक राज्यात झाली आहे त्यामुळे दक्षिण कोरियातील उद्योगसमुहांनी राज्यातील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. दक्षिण कोरियन नेत्यांनी राज्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांत विशेष रुची दर्शविली. त्यानंतर राज्यातील विविध पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी यावेळी उभयपक्षांत सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार स्मार्ट सिटी, महामार्ग, विमानतळ, मेट्रो आदी महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उभारणीत राज्याला दक्षिण कोरियाचे वाढीव सहकार्य लाभणार आहे. त्यात प्रकल्पांच्या अंमलबजावणीचे नियोजन, धोरणात्मक बाबी, तंत्रज्ञान, विधिविषयक यंत्रणा आदींचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोरियन नेत्यांचे आभार मानले.
या चर्चेदरम्यान महाराष्ट्राच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते.