मुंबई :  नाशिक लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे तर शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे समजते त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.  

नाशिक लोकसभेचे खासदार शिवसेना शिंदे गटाचे  हेमंत गोडसे आहेत.  त्यामुळे सुरूवातीपासूनच नाशिक लोकसभेवर शिवसेनेचा दावा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील अशी घोषणाही केली आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले होते. दरम्यान या लोकसभेवर भाजपने दावा केल्याने शिवसेना विरूध्द भाजप असा वाद निर्माण झाला हेाता. मात्र काही दिवसांपूर्वीच या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक मधून उतरविण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट नाराज झाला आहे. नाशिकची जागा शिवसेनेला सुटली नाही तर विद्यमान खासदार हेमंत गोडसे बंडखोरी करत अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.  

उमेदवारी जाहीर न झाल्याने नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे महायुती आणि एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याचपार्श्वभूमीवर शिंदे गटात नाराज असलेल्या हेमंत गोडसेंसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दरवाजे उघडे आहेत का? असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता संजय राऊत म्हणाले की, खासदार गोडसे हे सध्या शिंदे गटात असले तरी आम्ही त्यांना निवडून आणलं होतं. परंतु, आता कोणत्याही गद्दारासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे नाहीत. आमचा दरवाजा ठोठावलात, अंगणात बसलात आणि छाती बडवली तरीदेखील गद्दारांसाठी आमचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडले तर आमच्या निष्ठावंतांचा अपमान होईल. अनेक निष्ठावान, प्रामाणिक, स्वाभिमानी जनता आणि स्वाभिमानी शिवसैनिक मिळून आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र आलो आहोत. त्यामुळे गद्दारांसाठी आता दरवाजे उघडले तर या सर्व निष्ठावंतांचा अपमान होईल, अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

शिंदे गटावर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, शिंदेंच्या अनेक खासदारांचे पत्ते कट होणार आहेत. शिंदेंचाही पत्ता कट होऊ शकतो. कारण शिंदेंचे अनेक खासदार एकनाथ शिंदेंना डावलून परस्पर देवेंद्र फडणवीस यांना भेटत आहेत. लोक योग्यतेनुसार भेटायला जात आहेत. लोक आधी पाहतात की पॉवर सेंटर कुठे आहे, महत्त्वाचे निर्णय कोण घेऊ शकतं, त्यानुसार लोक त्या-त्या व्यक्तीकडे जातात. लोक कळसुत्री बाहुल्यांकडे जात नाहीत, बोलक्या बाहुल्यांकडे जात नाहीत, लोक बाहुल्यांची सूत्र हालवणाऱ्यांकडे जातात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!