मुंबई : शेतक-यांच्या आत्महत्या, वाढती महागाई तसेच बेरोजगारीने जनता त्रस्त असल्याने मोदींची लोकप्रियता घसरली आहे. देशात २०१४ आणि २०१९ मध्ये असलेली मोदी लाट २०२४ मध्ये ओसरली असल्याचे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी लोकांना एकत्र आणून महाविकास आघाडीला मतदान करावे यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षात मोदींनी लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक केलेली नाही. केवळ आश्वासने दिली. त्यामुळे लेाकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. संविधान धोक्यात आले आहे. यामुळे समविचारी लोकांना एकत्र करून जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकांच्या मनात राग आहे. त्यातच खोके देऊन आमदारांची फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. मोदी शहांनी ईडी सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर करून लोकांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे मोदींच्या दहशतीखाली कोणीही व्यक्त होत नाहीत. मात्र मतदानाच्या माध्यमातून मतदार व्यक्त होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकांचा पाठींबा मिळत असून निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागतील असेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही आपली मते व्यक्त केली यावेळी बदल घडणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
———–