डोंबिवली : सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा क्रॉस टाटा पॉवर लाईनखालील काही घरांचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुंडांच्या टोळक्याने केडीएमसीच्या पुढे जाऊन काम केले. कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेला पायदळी तुडवून या गुंडांनी तेथील रहिवाशांना जबरदस्तीने त्यांच्या राहत्या घरातून ओढून फरफटत बाहेर काढले. त्यांची घरे बुलडोजरच्या साह्याने भुईसपाट केली. रहिवाशांनी न्याय मागण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याचना केली. मात्र या प्रकरणी रामनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून बोळवण केल्याचे रहिवाशांनी सांगितले. पोलिसांच्या कृत्याबद्दल रहिवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कस्तुरी प्लाझा गृह-व्यापारी संकुलाच्या समोर असलेल्या बैठ्या घरांमध्ये मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास काही गुंड लाकडी दांडके घेऊन घुसले. या गुंडांनी मनगटाच्या जोरावर तेथील रहिवाशांना फरफटत घरांबाहेर काढले. त्यानंतर सोबत आणलेल्या बुलडोझरच्या साह्याने तेथील तीन-चार घरे नेस्तनाबूत केली. या गुंडांनी केलेल्या पाडकामात ही कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबियांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन कैफियत मांडली. एकीकडे पोलिसांनी पीडित कुटुंबीयांची चौकशी करत तक्रार घेण्याची प्रक्रिया सुरू केली. तर दुसरीकडे या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयामध्ये या जागेचा वाद सुरू आहे. कोणत्या गुंड व्यक्तींनी हे कृत्य केले आहे याचा तपास आम्ही करत आहेत. बेघर झालेल्या रहिवाशांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याययाचना करण्यासाठी धाव घेतली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नागरीत कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणाऱ्या गुंडांना पोलिस पाठीशी घालतात की त्यांचा समाचार घेतात ? याकडे बेघर झालेल्या रहिवाशांच्या नजरा लागल्या आहेत.