मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला बीएमसीकडून हरताळ ?
इर्ला प्रेमनगरवासियांचा मनपावर टमरेल मोर्चा : ४ शौचालये ४८ तासात तोडण्याची मनपाची नोटीस
मुंबई : विलेपार्ले पश्चिमेतील इर्ला प्रेमनगर परिसरातील पाचपैकी चार शौचालये ४८ तासात तोडण्याची नोटीस मुंबई महापालिकेने बजावल्याने या विरोधात स्थानिक रहिवाशांनी महापालिकेच्या के/ पश्चिम विभागावर टमरेल मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी रहिवाशांनी तोंडाला मोदींचे चित्र असलेले मास्क लावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला महापालिकेकडून हरताळ फासला जात असल्याची टीका यावेळी संतप्त नागरिकांनी केली.
इर्ला प्रेमनगर परिसरात पाच हजार लोकवस्ती आहे. या परिसरात महापालिकेचे पाच शौचालये आहेत. स्थानिक नागरिक या शौचालयाचा वापर करीत आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने पाचपैकी ४ शौचालय ४८ तासात तोडण्याची नोटीस बजावल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. हे शौचालय तोडण्यात येऊ नये यासाठी इर्ला प्रेमनगर रहिवाशी संघ आणि स्थानिक नगरसेविका सुनीता मेहता यांनी के पश्चिम विभागाच्या सहाययक आयुक्तांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर सोमवारी सुमारे दोनशे नागरिकांनी के पश्चिम कार्यालयावर टमरेल मोर्चा काढून धडक दिली. सदरा शौचालय तोडल्यानंतर रहिवाशांनी शौचालयासाठी कुठे जायचे, असा सवाल रहिवाशांकडून विचारला जात आहे. महिला वर्ग वृध्द नागरिक लहान मुले यांची कुचंबना होणार आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे स्वच्छ भारत अभियानाला धक्का बसणार आहे. त्यामुळे हे शौचालय तोडू नये अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली.