पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्यावरुन भारताला लक्ष केल्यानंतर भारताने पाकिस्तानसह इतर इस्लामिक देशांना चांगलेच खडेबोल सुनावले.
नवी दिल्ली- पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्यावरुन भारताला लक्ष केल्यानंतर भारताने पाकिस्तानसह इतर इस्लामिक देशांना चांगलेच खडेबोल सुनावले. ‘काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही. भविष्यात असे मतप्रदर्शनामध्ये पडू नये,’ असे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी डॉ. सुमीत सेठ यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
जगातील मुस्लिमांचा आवाज म्हणून ५७ मुस्लिम राष्ट्रांनी ‘ऑर्गनायझेशन ऑफ द इस्लामिक को-ऑपरेशन’ (ओआयसी) ही संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या वतीने पाकिस्तानने नुकतेच जम्मू-काश्मीरबद्दल भाष्य केले होते. ओआयसीच्या वतीने पाकने हे वक्तव्य केल्याने भारताने याची गंभीर दखल घेतली. जम्मू-काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रामध्ये केला होता.
‘ओआयसीने काश्मीरच्या विषयावर पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. आम्ही हे सर्व आरोप फेटाळून लावतो. भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करण्याचा ओआयसीला अधिकार नाही. भविष्यात त्यांनी अशी वक्तव्य टाळावीत,’ असे सेठ यांनी बजावले आहे.
जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा देण्याची ओआयसीची ही पहिलीच वेळ नाही. मागच्या काहीवर्षात ओआयसीने सातत्याने काश्मीरप्रश्नी विधाने केली आहेत. मात्र भारतानेही त्याला सडेतोड उत्तर दिले आहेत.