मुंबई दि. १४ : लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. आता २०१९ च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.
२०१४ मध्ये या तिसऱ्या वर्गवारीमध्ये ९१८ मतदारांची नोंद करण्यात आली. २०१९ मध्ये म्हणजे आणखी पाच वर्षांनी करण्यात आलेल्या नोंदीमध्ये हा आकडा दुप्पटीने वाढला होता आणि ही संख्या २०८६ इतकी झाली आहे. आता तर यावर्षी म्हणजेच ४ एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात आलेल्या राज्याच्या एकूण मतदार संख्येत ५ हजार ६१७ तृतीयपंथी मतदार आहेत. यावेळी सर्वांत जास्त तृतीयपंथी मतदारांची नोंद ठाणे जिल्हयात करण्यात आली आहे. १ हजार २७९ तृतीयपंथी मतदारांची नोंद ठाणे जिल्ह्यात करण्यात आली आहे. मुंबई उपनगरमध्ये ८१२ आणि पुण्यात ७२६ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.
यावर्षी गोंदियामध्ये १०, गडचिरोलीत ९, हिंगोलीमध्ये ७, भंडाऱ्यात ५ आणि सिंधुदुर्गमध्ये १ अशी तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. तृतीयपंथी कार्यकर्ते गौरी सावंत, प्रणीत हाटे आणि झैनाब पटेल हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१४ साली तृतीयपंथी मतदारांना प्रथम मतदानाचा अधिकार मिळाला. आणि तेव्हापासूनच तृतीयपंथी अशा स्वतंत्र वर्गवारीत या समूहाची नोंद करण्यात येऊ लागली. २०१९ मध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मतदारांची संख्या दुप्पटीने वाढली असल्याचे दिसून आले होते. तर २०२४ मध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत दुप्पटीपेक्षाही अधिक तृतीयपंथी मतदार संख्या वाढली आहे. याचाच अर्थ आज तृतीयपंथी सुध्दा आपल्या मतदानाच्या हक्काबाबत सजग असून मतदान नाव नोंदणीसाठी पुढे येत आहेत.