डोंबिवली : भारतातील उद्योग आणि वाणिज्य संघटनांची शिखर संस्था असलेल्या नवी दिल्ली स्थित असोचॅम यांच्याद्वारे दिला जाणारा “वूमन इन सायबर” हा राष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार यंदा महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे यांना प्रदान करण्यात आला. सहकारी बँकांना सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि बँकिंग सायबर क्षेत्रातील विविध उपक्रमांची दखल म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. बुधवारी नवी दिल्लीहून प्रसारित आभासी पद्धतीने पार पडलेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
असोचॅम ही भारतातील उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातील संघटनांची सर्वात जुनी शिखर संस्था असून प्रतिवर्षी त्यांच्या माध्यमातून विविध उद्योग व वाणिज्य क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांना पुरस्कृत केले जाते. यंदा सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील महिलांना पुरस्कार देण्याचं असोचॅमने ठरवले.
महाराष्ट्रातील सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स असोसिएशन या राज्यातील ८० वर्षे जुन्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या स्वाती पांडे यांनी सहकारी बँकांवर वाढत असलेल्या सायबर हल्ल्यांना रोखणारी सी-सॉक यंत्रणा कार्यान्वित करण्याची योजना आखली. या सायबर सिक्युरिटी ऑपरेटिंग सेंटर अर्थात सी सॉक प्रभावी यंत्रणेच्या माध्यमातून सभासद बँकांना संभाव्य सायबर हल्ल्यांबाबत सूचना दिली जाते तसेच या केंद्रीय यंत्रणेमुळे सर्व स्तरावरील छोट्या मोठ्या बँकांनाही सायबर हल्ल्याविरुद्ध जनजागृती करण्याबाबत स्वाती पांडे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. या यंत्रणेमुळे महाराष्ट्रातील अनेक छोट्या मोठ्या सहकारी बँकांच्या खात्यांचे आंतरराष्ट्रीय सायबर हल्ल्यापासून संरक्षण झाले आहे.
भारत सरकारच्या आयटी मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव ज्योती अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत आभासी पद्धतीने पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी पुरस्कार परीक्षक मंडळाचे अध्यक्ष व माजी राष्ट्रीय सायबर सुरक्षा सल्लागार गुलशन राय, टीसीएसच्या सायबर सिक्युरिटी प्रमुख संथा सुब्रमणि, डेलचे श्रीराम ओहरी, असोचॅमचे सायबर सिक्युरिटी कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष व मायक्रोसॉफ्टचे दीपक तलवार व अर्न्स्ट अँड यंगच्या भागीदार मिनी गुप्ता असे उद्योग व वाणिज्य क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.