डोंबिवली. : अमेरिकेत वित्तव्यवस्थापन विषयात मास्टर्स करतानाच अर्थनियोजन या क्षेत्रातील एक शिकाऊ उमेदवार म्हणून चैताली मेहताने नोकरीला सुरुवात केली. आज ती व्यवसाय आणि अर्थविषयक विश्लेषक म्हणून फिनमार्केट या अमेरिकन कंपनीत कार्यरत आहे. अमेरिकेतील ‘वुमन ऑफ कलर ‘ या अग्रगण्य नियतकालिकाच्या ताज्या अंकात ‘ वुमन ऑफ फिन्टेक ‘ या लेखात तिच्या या भरारीची कौतुकास्पद दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांची मान पून्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. चैताली ही प्रसिध्दी वृत्तपत्र छायाचित्रकार मनोज मेहता यांची कन्या आहे.
मूळची डोंबिवलीकर असणारी चैताली आज न्यूयॉर्क मध्ये आपल्या नोकरीत अकौंटिंग , आर्थिक नियोजन आणि विश्लेषण , रोखीचे नियोजन या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत आहे. त्याचबरोबर शासकीय कायदेकानूंचे कटाक्षाने पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवणे हाही तिच्या कामातील महत्त्वाचा भाग आहे. यासोबतच कंपनीचे संचालक मंडळ आणि वित्तविषयक प्रमुख अधिकारी यांना वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्यासाठी मदत करणे , वेगवेगळ्या आर्थिक मापदंडानुसार कंपनीच्या विविध विभागांची कार्यक्षमता तपासणे याकडेही तिला विशेष लक्ष द्यावे लागते.
कोणत्याही उद्योगातील अर्थविश्लेषकाला आपल्या क्षेत्रातील बदलते प्रवाह ( ट्रेंड्स) समजून घ्यावे लागतात. या प्रवाहांनुसार स्वतःच्या उद्योगाला वळण लावताना आर्थिक शिस्तीचे डोळ्यात तेल घालून पालन करावे लागते. कारण आपल्या भागधारकांची पुंजी सुरक्षित ठेवून वाढवणे आणि कंपनीच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन योजनांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहणे हे दुहेरी उद्दिष्ट साध्य करायचे असते. चैताली सुद्धा याला अपवाद नाही. साहजिकच यासाठी विविध प्रकारच्या माहितीचे , विदेचे ( डेटाचे) सातत्याने विश्लेषण करावे लागते. छोटी छोटी प्रोजेक्ट्स हाताळत पुढे जावे लागते. खर्चावर नियंत्रण ठेवून जास्तीत जास्त कमाई कशी करता येईल याचा वेध घेत राहाणे हे आव्हान पेलावे लागते.
उद्योग व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवी घेताना वित्तव्यवस्थापन आणि तंत्रज्ञान यात चैतालीने विशेष नैपुण्य मिळवले आहे. एमबीए इन फायनान्स स्टीव्हन्स इन्स्टीटयूट ऑफ टेक्नोलॉजी हुकबोकन न्यू जर्सी .याच मास्टर्स डिग्रीच्या जोरावर तिने अल्पावधीत फिनमार्केट मध्ये आपला ठसा उमटवला आहे. डोंबिवलीच्या प्रसिद्ध विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थिनी आहे. विद्यार्थीदशेत असताना तिने जिम्नॅस्टिक मध्ये राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केले. आज “वित्तीय क्षेत्रातील कसरतपटू ” म्हणून अमेरिकेतील ‘वुमन ऑफ कलर ‘ या अग्रगण्य नियतकालिकाच्या ताज्या अंकात ‘Women of Fintech’ या लेखात तिच्या या भरारीची कौतुकास्पद दखल घेण्यात आली आहे.