दासगाव ग्रामपंचायतीमध्ये ६० वर्षांनी परिवर्तन
कॉंग्रेसचे सरपंचपद सेनेकडे खेचण्यास दिलीप उकिर्डे यांना यश
महाड ( निलेश पवार) : महाड तालुक्यातील दासगाव हि एक महत्वाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत स्थापनेपासून सरपंच पद कॉंग्रेस कडे राहिले आहे. मात्र यावेळी येथील सेना उमेदवार दिलीप उर्फ सोन्या उकिर्डे यांनी इतिहास रचत ६० वर्षाच्या परंपरेत बदल केला आहे. याठिकाणी यावेळी सरपंच पद शिवसेनेकडे खेचून आणले आहे.
दासगाव हे ऐतिहासिक, राजकीय, दृष्ट्या महत्वाचे गाव ओळखले जाते. दासगाव जवळ दौलतगड आहे. या गावाला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्श झाला आहे. महाड सत्याग्रहाला बाबासाहेब आले असता दासगाव याठिकाणी बोटीतून आले होते. दासगाव हे जुने बंदर आहे. या ठिकाणी ब्रिटीश काळापासून बंदर अस्तित्वात आहे. दासगाव मधील सुक्या मासळीचा बाजार देखील तालुक्यात प्रसिद्ध आहे. अशा या गावात राजकीय वातावरण देखील कायम महत्वाचे राहिले आहे. मंगळवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीकरिता संपूर्ण तालुक्याचे या गावाकडे लक्ष राहिले होते. शिवसेना विभाग प्रमुख दिलीप उकिर्डे हे यावेळी सरपंच पदाच्या रिंगणात होते तर कॉंग्रेस कडून नथुराम निंबरे, अपक्ष म्हणून तेजस मिंडे हे उभे होते. दासगाव ग्रामपंचायत स्थापना झाल्यापासून याठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. सुरवातीपासूनच याठिकाणी कॉंग्रेसचे वाय.बी.शेखनाग, कुशाभाई गुजर, जयराम मिंडे, तुकाराम चांढवेकर, विजय चांढवेकर, सुप्रिया संतोष जाधव, प्रज्ञा खैरे, हे आतापर्यंत कॉंग्रेस सरपंच राहिले आहेत. मात्र निवडणूक निकालात दासगाव मधील हे चित्र बदलले आहे. या बदललेल्या चित्राबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी येथील शिवसेना उमेदवार दिलीप उकिर्डे यांच्या समाजकार्याचे हे यश असल्याचे बोलले जाते.
दासगाव ग्रामपंचायत मध्ये ११ सदस्य संख्या आहे. यावेळी अपक्ष दोन, शिवसेना ३, आणि कॉंग्रेसचे ६ सदस्य निवडून आले आहेत. याठिकाणी सरपंच पद कायम कॉंग्रेस कडे राहिले आहे मात्र दिलीप उकिर्डे यांनी याठिकाणी परिवर्तन करत सरपंचपदी विराजमान होण्याचा मान पटकावला आहे. दिलीप उकिर्डे हे जनसामान्यांच्या मदतीकरिता कायम धाऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे शिवाय याठिकाणी सामाजिक कामात ते कायम अग्रेसर राहिले आहेत. दिलीप उकिर्डे यांच्या सामाजिक कामाची पोचपावती दासगाव करांनी दिली असल्याची प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली.