पुणे, नागपूर विमानतळासह महानगर क्षेत्रासाठी
सिंगापूरच्या सहकार्याने संयुक्त कृतीगट स्थापन
मुंबई, दि. 29 : राज्यातील पुणे व नागपूर विमानतळाच्या विकासासाठी चांगी एअरपोर्ट कंपनीबरोबरचे सहकार्य वाढविणे आणि पुणे-नागपूर महानगर क्षेत्राच्या नियोजन व विकासासाठी सुर्बाना ज्युराँग कंपनीचे सहकार्य घेणे या दोन प्रमुख उद्देशांसाठी सिंगापूरच्या सहकार्याने संयुक्त कृतीगट स्थापन करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली हेसन लोंग यांच्यात चर्चा झाली. त्यानुसारच मुख्यमंत्र्यांसह सिंगापूरचे उद्योगमंत्री एस. ईश्वरन यांच्या अध्यक्षतेत संयुक्त कृतीगट स्थापन करण्यात येणार आहे.
सिंगापूरच्या दौऱ्याचा अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्रात राबविले जात असलेले विविध पायाभूत सुविधा प्रकल्प, मोठ्या प्रमाणात होत असलेली गुंतवणूक आणि विविध क्षेत्रातील गतिमान प्रगती याविषयीची माहिती पंतप्रधान लोंग यांना दिली. लोंग आगामी वर्षारंभी भारतभेटीवर येत आहेत. त्यावेळी महाराष्ट्राला भेट देण्याचे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंगापूरचे उपपंतप्रधान थर्मन षन्मुगरत्नम् यांचीही आज भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
विमानतळ विकासासाठी सामंजस्य करार
मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी सिंगापूरचे व्यापार आणि घेतली. सिंगापूर आणि महाराष्ट्र यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी वृद्धिंगत करण्याविषयी उद्योगमंत्री एस. ईश्वरन यांची भेट त्यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील पोर्टआधारित विकास, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि विमानतळ विकास यांचा समावेश आहे. पुणे आणि नागपूर महानगरांमधील गुंतवणुकीच्या प्रस्तावांना गती देण्यासंदर्भात एक संयुक्त कृतीगट स्थापन करण्यासंदर्भात उद्योगमंत्री ईश्वरन यांनी सहमती दर्शविली. त्याचप्रमाणे यावेळी चांगी एअरपोर्ट इंटरनॅशनल लिमिटेड आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) यांच्यात विमानतळ विकासासाठी अधिक सहकार्य करण्यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार नियोजन, व्यावसायिक विकास, सेवासुधार, प्रशिक्षण व ज्ञानाचे आदानप्रदान, कार्गो हाताळणी, व्यवस्थापन या क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सिंगापूरमधील विविध उद्योजकांशी चर्चा करता यावी यासाठी श्री. ईश्वरन यांनी एका राऊंडटेबल बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी नागरी उड्डयण, बँक, पायाभूत सुविधा, नगरविकास आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योजकांशी मुख्यमंत्र्यांनी मोकळेपणाने संवाद साधला.