अण्णाभाऊ साठेंचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार

मुंबई – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. घाटकोपर परिसरातील चिरागनगरात अण्णाभाऊंचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात येणार आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याची मागणी विविध स्तरातून राज्य सरकारकडे करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊंचे स्मारक उभारण्यासाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत स्मारक उभारण्याच्या कामास गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत स्मारकासाठी जागेची निवड, स्मारक परिसराचा विकास, स्मारक परिसरातील भाडेकरुंचे पुनर्वसन, विकासकाची नियुक्ती यासह इतर कामकाजात सहयोग देण्यात येणार आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उपाध्यक्ष व सदस्य सचिव म्हणून मधुकरराव कांबळे त्याचबरोबर सदस्य म्हणून आमदार श्रीकांत देशपांडे, संजय कुटे, सुधाकर भालेराव, राम कदम तसेच नगरसेवक अमित गोरखे यांच्यासह विविध शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!