मुंबई : मुंबईवर 26/11 ला जो हल्ला झाला. त्यात ज्या बुलेट्स हेमंत करकरे आणि साळसकर यांच्या शरीरात मिळाल्या, त्या जर कसाब आणि अबू इस्माईल यांच्या बंदुकीतील नसतील, तर तो तिसरा कोण आहे ? वरिष्ठ वकील म्हणून हा प्रश्न उज्ज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उज्ज्वल निकम यांना विचारला आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आंबेडकर यांनी म्हटले आहे की, उज्ज्वल निकम यांना माझे दोन प्रश्न आहेत. निवडणुकीच्या आधी त्यांनी उत्तर द्यावे असे त्यांना आव्हान आहे. मुंबईवर हल्ला झाला ते खरे आहे, याला पाकिस्तानने रसद पुरवली याबाबत दुमत नाही. पण या घटनेच्या आड कोणीतरी दुसरी घटना घडवून आणलीय का ?  याचा खुलासा निकम यांनी करावा. पोलीस अधिकाऱ्यांना लागलेल्या बुलेट्स ज्यावेळी मॅच झाल्या नाहीत, तेव्हा त्या बुलेट्स कोणत्या शस्त्रातील होत्या ? पोलिसांच्या शस्त्रातील होत्या की, पोलीस न वापरणाऱ्या शस्त्रातील होत्या याबाबत त्यांनी अतिरिक्त चौकशी का केली नाही. आणि कोर्टाला ही बाब त्यांनी नजरेस का आणून दिली नाही ? याचा खुलासा निकम करतील अशी अपेक्षा करतो.

माझे पुतळे कोणाला जाळायचे असतील त्यांनी जाळावेत, त्यांनी देशद्रोही घोषित करावं मला फरक पडत नाही. पण माझ्या एका प्रश्नाचे उत्तर उज्ज्वल निकम यांनी द्यावं. तो म्हणजे जे आरोपी आहेत त्यांच्या शस्त्रातील बुलेट्स नाहीत, मग बुलेट्स कोणत्या शस्त्रातील आहेत याची चौकशी अधिकाऱ्यामार्फत किंवा कोर्टामार्फत का केली नाही ? असा सवाल त्यांनी उज्ज्वल निकम यांना केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!