घाटकोपर येथील जलवाहिनीवरील पादचारी पुलाचे काम वर्ष भरापासून रखडले
घाटकोपर ( निलेश मोरे ) : घाटकोपर पश्चिम माणिकलाल येथील तानसा जवाहिनीवरील पादचारी पुलाचे काम वर्षभरापासून रखडल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही तानसा जलवाहिनी महापालिकेच्या दोन वार्ड मध्ये येत असल्याने पुलाच्या उंचीवरून आजी आणि माजी नगरसेवकांमध्ये तू तू में में चा वाद निर्माण झाल्याने या पुलाचे बांधकाम बंद पडल्याची माहिती समोर येत आहे.
तानसा जलवाहिनीवरील हा साठ वर्ष जुना पादचारी पूल जुना झाल्याने 2016 साली तत्कालीन भाजपा नगरसेविका तथा शिक्षण समिती अध्यक्षा रितु राजेश तावडे यांच्या प्रयत्नाने हा पादचारी पूल पाडून नव्याने त्याची निर्मिती करण्यास सुरवात झाली. 50 लाख रुपये या पादचारी पुलाच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आले होते. कामाला सुरुवात देखील झाली. पुलाचा लोखंडी ढाचा उभा करण्यात आला मात्र निवडणुकांनंतर या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी हांडे निवडून आल्या. सदर पुलाची उंची हि चार मीटर एवढी ठेवण्यात आली होती.परंतु स्थानिक इमारतीतील रहिवाशांनी उंचीवर आक्षेप घेत विरोध केला होता . इमारतीच्या एका मजल्या पर्यंत उंची घेतल्यास त्याचा इमारतीच्या सुरक्षेवर परिणाम होईल अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे. तर नागरिकांनी स्वतः इतक्या उंचीची मागणी केली असल्याचे
माजी नगरसेविका रितू तावडे यांचे म्हणणे आहे.
तानसा जलवाहिनीवरून घाटकोपर स्थानकाकडे जाण्यासाठी हा पादचारी मार्ग घाटकोपर स्थानकाकडे जाण्यासाठी अतिशय जवळचा मार्ग आहे. तसेच या पुलाच्या दोन्ही बाजूला नव्याने जॉगिंग ट्रक आणि उद्याने हि उभारण्यात आली आहेत. या पादचारी पुलाखालून आर बी कदम मार्ग ते लाल बहादूर शास्त्री मार्ग असा एकच मोठा जॉगिंग ट्रॅक व्हावा तसेच नागरिकांना पुलाच्या उंचीचा त्रास होऊ नये त्या खालून सहज ये जा करता यावी म्हणून त्याची उंची सव्वा चार मीटर पर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि तशी मागणी नागरिकांची होती. परंतु मी केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आणि काही तरी बदल केल्याचे दाखवून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नगरसेविका करीत असल्याचे माजी नगरसेविका रितू तावडे यांचे म्हणणे आहे.
तर पादचारी पुलाच्या बाजूला असलेल्या इमारतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच या पादचारी पुलाच्या उंचीचा त्रास नागरिकांना , विध्यार्थ्यांना होऊ नये म्हणून नागरिकांच्या मागणीनेच या पादचारी पुलाची उंची तीन मीटर पर्यंत करण्याची मागणी केली असून लवकरच या पुलाच्या कामाला सुरवात होणार आहे असे सांगितले जाते पालिकेच्या पूल विभागाचे अभियंते शीतला प्रसाद कोरी यांना विचारले असता त्यांनी मला या पुलाची काहीच माहिती नाही माहिती घ्यावी लागेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.गेली साठ ते सत्तर वर्ष या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना सध्या पादचारी पूल नसल्याने , उघड्या वीज वाहिन्या, तानसा जलवाहिनीचे उंचवटे, खड्डे यांच्यातून रस्ता काढीत प्रवास करावा लागत असल्याने या पादचारी पुलाची लवकरात लवकर उभारणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.