विशेष प्रतिनिधी/ मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ५ पैकी तब्बल ३ जागांवर महायुतीला पराभव सहन करावा लागल्याने मित्रपक्षांमधील अस्वस्थता आता थेट चव्हाट्यावर आली आहे. निकालानंतर महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघडा पडला असून, भाजपने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर पराभवाचे खापर फोडल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. तर शिंदे सेनेने थेट राज्यातील नेतृत्व बदलण्याची वेळ आली आहे,” असा थेट निशाणा साधल्याने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

महायुतीचा परफॉर्मन्स फ्लॉप; मविआची मुसंडी

पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर या तिन्ही महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या जागांवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला. यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन आणि काँग्रेसने एका जागेवर बाजी मारली. सत्ता हाती असूनही महायुतीच्या पदरात अवघ्या दोन जागा पडल्या. भाजपला दोन ठिकाणी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका जागेवर फटका बसला. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकाही जागेवर खाते उघडता आले नाही.

भाजप प्रवक्त्याची ‘एक्स’ पोस्ट अन् शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा!

पराभवाचा धक्का पचवणे भाजपला कठीण जात असल्याचे चित्र आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर केलेल्या एका स्फोटक पोस्टमुळे महायुतीतील दरी स्पष्ट झाली. त्यांनी या पराभवासाठी थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि त्यांच्या निष्क्रियतेला जबाबदार धरले आहे. बन यांच्या या पोस्टमुळे भाजपच्या मनात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत असणारी खदखद आणि अस्वस्थता पहिल्यांदाच जाहीरपणे बाहेर आली आहे.

राज्यातील नेतृत्व बदलण्याची वेळ : शिंदे सेनेची थेट नाराजी

दरम्यान, शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनीही जोरदार टोला लगावला. “नवनाथ बन यांना जे आता समजले, ते निवडणुकीच्या आधीच समजायला हवे होते. ही राज्यातील नेतृत्वावरची थेट नाराजी आहे. राज्यातील नेतृत्व बदलण्याची वेळ आली आहे,” असा थेट निशाणा साधत धंगेकरांनी एकनाथ शिंदेकडे नेतृत्व दिले पाहिजे अशी भूमिका मांडली.

रवींद्र चव्हाण ॲक्शन मोडवर; झाडाझडती सुरू

विधान परिषदेच्या या निकालाने महायुतीमधील ‘ऑल इज वेल’ नसल्याचे स्पष्ट केले असून, येत्या काळात दिल्लीतील हायकमांड यावर काय कठोर पावले उचलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तीन जागांमधील पराभव आणि मित्रपक्षांच्या भूमिकेमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आक्रमक मोडमध्ये आले आहेत. नागपूर आणि पुण्यातील सर्व जिल्ह्यांचा लेखाजोखा घेतला जात असून, स्थानिक जिल्हाध्यक्ष, आमदार आणि मंत्र्यांची कडक झाडाझडती सुरू झाली आहे. निष्काळजीपणा दाखवणाऱ्या भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.

रवींद्र चव्हाण येत्या २ नोव्हेंबर रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पराभवाचे संपूर्ण विश्लेषण, स्थानिक नेत्यांची कामगिरी आणि महायुतीच्या मित्रपक्षांनी (विशेषतः शिवसेनेने) घेतलेली संशयास्पद भूमिका याचा सविस्तर अहवाल शाह यांच्यासमोर मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मतदार संघ : विजयी उमेदवार
१) पुणे पदवीधर : हर्षदा देशमुख- जाधव (राकाँप शप गट)
२) औरंगाबाद पदवीधर : प्रतापसिंह पाटील (राकाँप शप गट)
३) पुणे शिक्षक : कौस्तुभ गावडे (भाजप)
४) अमरावती शिक्षक : किरण सरनाईक ( शिवसेना शिंदे गट)
५) नागपूर पदवीधर : अभिजित वंजारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *