Antartic

पणजी, 24 एप्रिल: राष्ट्रीय ध्रुवीय तसेच महासागरी संशोधन केंद्र येथे कार्यरत डॉ.बाबुला जेना आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटन मधील ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेक्षण संस्थेच्या सहकार्याने नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासाद्वारे, अंटार्क्टिक परिसरातील हिम विस्तारामध्ये आलेले अभूतपूर्व अडथळे तसेच वर्ष 2023 मधील सर्वाधिक प्रमाणातील बर्फाच्छादनाच्या आधी बर्फ वितळण्याच्या क्रियेतील अडचणी यांना कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितीचा शोध लावला आहे.

जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दशकात आर्क्टिक प्रदेशात समुद्री बर्फ लक्षणीय प्रमाणात कमी झाला तर अंटार्क्टिक परिसरातील 2015 पर्यंत मध्यम प्रमाणात वाढ होत जाणाऱ्या बर्फात वर्ष 2016 पासून अचानक घसरण होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, 2016 पासून 2013 पर्यंतच्या प्रत्येक उन्हाळ्यात समुद्रातील बर्फाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आणि 2023 मध्ये तर अभूतपूर्व मंद वेगाने बर्फाचा विस्तार किंवा वितळणे दिसून आले. अंटार्क्टिक परिसरात दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी त्या वर्षीचा सर्वाधिक बर्फ नोंदवताना अत्यंत कमी वेगाने बर्फाचे प्रसरण दिसून आले. त्यावेळी बर्फाचे प्रमाण 16.98 दशलक्ष चौरस किमी होते आणि जे दीर्घकालीन सरासरीपेक्षा 1.46 दशलक्ष चौरस किमीने कमी होते. सागरी बर्फाच्या प्रमाणात दिसून आलेल्या बदलांच्या मागील कारणे, वैज्ञानिक समुदाय आणि धोरणकर्ते अशा दोन्ही घटकांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्नचिन्ह बनून राहिली होती.

नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष असे सुचवतात की महासागराच्या वरच्या भागातील अति उष्णता 2023 मधील बर्फाचा विस्तार रोखण्यास कारणीभूत होती मात्र या काळात वातावरणीय अभिसरणात झालेले बदल देखील लक्षणीय होते आणि त्यांनी देखील या परिणामात महत्त्वाची भूमिका निभावली.अत्यंत खोल, अमुंदसेन सी लो सारखे वाऱ्यांच्या प्रकारातील बदल आणि त्यांचे पूर्वेकडे सरकणे यामुळे वेडेल समुद्रामध्ये वाऱ्याचे अत्यंत सशक्त उत्तरी प्रवाह निर्माण झाले. उत्तरी वाऱ्यांनी विक्रमी प्रमाणात वातावरणीय तापमान वाढ केली आणि हिमखंडाला त्याच्या नेहमीच्या जागेकडून दक्षिणेकडे सरकण्यास भाग पाडले. येथे हे सांगणे महत्त्वाचे आहे की अमुंदसेन सी लो ही कमी दाबाची प्रणाली असून ती पश्चिम अंटार्क्टिका आणि सभोवतालच्या महासागरी परिसरातील हवामानविषयक चढउतारांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकते. वातावरणीय ब्लॉकचे विक्रमी प्रमाणात सशक्तीकरण झाल्यामुळे रॉस हिमकड्यापासून जोरदार उत्तरी वारे वाहू लागल्यामुळे रॉस समुद्रातील बर्फाच्या प्रमाणात जलद बदल घडून आले.

थोडक्यात, महासागरावरच्या अपवादात्मक वातावरणातील तापमानवाढीचा प्रभाव तसेच वाऱ्याचे स्थित्यंतर, उष्णतेचा प्रवाह, प्रतिकूल वारे आणि आणि ध्रुवीय चक्रीवादळांमुळे (वादळ) महासागरात उसळणाऱ्या उंच लाटा या सर्वांमुळे अंटार्क्टिकमध्ये बर्फाची नीचांकी पातळी असण्याची स्थिती निर्माण झाली.

विशेषतः, चक्रीवादळांमुळे अपवादात्मक रीत्या बर्फाचे प्रमाण न वाढण्याचे किंवा कमी होण्याचे प्रसंग निर्माण झाले. उदाहरणार्थ, ब्रिटनच्या आकाराच्या समतुल्य ~2.3 × 105 चौरस किलोमीटर इतक्या बर्फाच्या क्षेत्रफळाच्या नुकसानासह वेडेल सागरातील बर्फाचा किनारा काही दिवसांत (256 किमी दक्षिणेकडे) वेगाने दक्षिणेकडे सरकला. कमी बर्फ असण्याची स्थिती निर्माण झाल्याने त्याचा हवामान बदलाचे परिणाम वाढण्याच्या (आइस-अल्बेडो फीडबॅक प्रक्रियेद्वारे) दक्षिण महासागरातील जीवन, प्रादेशिक परिसंस्था, महासागर अभिसरण, आइस शेल्फ स्थिरता आणि समुद्र पातळीत वाढ यावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे.

उपग्रहांच्या निरीक्षणांती तुलनेने लहान नोंदी पाहता (~45 वर्षे ) हवामान विषयक प्रारूपांच्या अंदाजानुसार गेल्या सात वर्षांत निरीक्षण केलेली बर्फाच्या प्रमाणात झालेली घट आणि सध्याच्या बर्फाच्या वाढीतील घट ही एका दीर्घकालीन घसरणीचा एक भाग आहे की नाही याचे मूल्यांकन करणे कठीण आहे. .

नैसर्गिक हवामानातील परिवर्तनशीलता ही सध्याच्या बर्फाच्या प्रमाणातील घट होण्यामागील एक महत्वाचे कारण असून, अशा विसंगत घटनेला चालना देण्यासाठी मानववंशजन्य घटकांचा प्रभाव देखील महत्त्वाचा असतो. मानववंशजन्य घटकांचा प्रभाव आणि हवामान परिवर्तनशीलता यांच्यातील परस्पर संबंध हा अस्पष्ट असून त्या दृष्टीने अधिक संशोधनाची गरज आहे.

NCPOR विषयी

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत, असलेली राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (NCPOR) ही संस्था, देशातील ध्रुवीय आणि महासागर विज्ञानातील संशोधन विषयक उपक्रमांसाठी जबाबदार असलेली भारतातील प्रमुख संशोधन आणि विकास संस्था आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!