नांदेड : एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि दोघांनी मिळून अर्धी केलेली उरलीसुरली काँग्रेस यांची तीनचाकी ऑटोरिक्षा महाराष्ट्राचा विकास करू शकणार नाही, इंजिन एकाचे, चाके एकाची, आणि सुटे भाग तिसऱ्याचे अशी ही रिक्षा निवडणुकीच्या निकालानंतर आणखीनच मोडीत निघणार असून एकमेकांशी संघर्ष करणार आहे, तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी देशाला विकास आणि समृद्धीच्या दिशेने नेणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर बसविण्याचा निर्धार करा, असे आवाहन करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नांदेड येथे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराचा जोरदार प्रारंभ केला.
आगामी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविणारी निवडणूक आहे. मोदी यांनी दहा वर्षांत देश समृद्ध केला. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारच्या काळात अकराव्या क्रमांकावर असलेली देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर बसल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणणार, ही मोदी यांची गॅरंटी आहे, असेही अमित शाह म्हणाले. आपल्या तडाखेबंद भाषणात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्ला चढविला. शरद पवार केंद्रात दहा वर्षे मंत्री होते, पण त्यांनी महाराष्ट्राला काय दिले, असा सवाल करताना, मोदी सरकारने महाराष्ट्रासाठी केलेल्या कामांची यादीच अमित शाह यांनी सादर केली.