डोंबिवली – येथील फडके रस्त्यावरील सह्याद्री को. ऑपरेटिव्ह बँकेला एक कोटी पाच लाख रूपयांचा दंड ठोठावून कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने बँकेला एक महिन्याच्या आत मालमत्ता धारकाची जागा खाली करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती जमिनीचे मालक आणि जोंधळे विद्या समुहाचे प्रमुख शिवाजीराव जोंधळे यांनी दिली.
या जमिनीचे मालक आणि जोंधळे विद्या समुहाचे प्रमुख शिवाजीराव जोंधळे यांच्या मालकीची फडके ररस्त्यावर चिराग सोसायटी इमारतीत एक हजार १०८ चौरस फुटाची मालमत्ता आहे. ही मालमत्ता जोंधळे यांनी काही अटी शर्तींवर सह्याद्री बँकेला भाड्याने दिली होती. ही जागा आपणास आपल्या कामासाठी तातडीने पाहिजे ती लवकर खाली करावी म्हणून शिवाजीराव जोंधळे यांच्याकडून बँकेला वारंवार नोटिसा देण्यात येत होत्या. त्याची दखल बँक व्यवस्थापनाकडून घेतली जात नव्हती.
बँकेकडून जागा खाली केली जात नसल्याने अखेर जोंधळे यांनी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात यासंदर्भात एक दावा दाखल केला होता. सह्याद्री बँकेला तातडीने जागा खाली करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. कल्याण न्यायालयाचे वरिष्ठ खंडपीठाचे न्यायाधीश ए. एस. लांजेवार यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन बँँकेच्या मख्य कार्यकारी अधिकारी यांना बँकेचे मागील थकलेले सुमारे एक कोटी २३ लाखाचे भाडे २४ लाखाच्या व्याजासह देण्याचे आदेश दिले.
बँकेने कराराप्रमाणे भाडे देणे थकविल्याने ही याचिका करावी लागली, असे जोंधळे यांनी सांगितले.मागील १३ वर्षापूर्वी ही मालमत्ता आपण बँकेला दरमहा एक लाख चार हजार रूपये दराने भाड्याने दिली होती. दरवर्षी या जागेचे भाडे वाढविले जात होते. बँकेबरोबरचा करार २०१६ मध्ये संपला. तेव्हापासून बँकेला आपण जागा खाली करण्यासाठी नोटिसा देत होते. त्याची दखल घेतली जात नव्हती. अखेर कोर्टात धाव घ्यावी लागली असे जोंधळे यांनी सांगितले.