मुंबई: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (आयपीएस) यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली ध्यास उत्तमाचा…अध्याय – १ हा कार्यक्रम रविवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी डोंबिवली येथील नीलपद्म सभागृहात मोठ्या आनंद उत्साहात संपन्न झाला. यावेळी सुप्रसिद्ध राष्ट्रीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक नागराज मंजुळे, गझलनवाज भीमराव पांचाळे, सुप्रसिद्ध गायिका डॉ.भाग्यश्री पांचाळे,पद्मभूषण ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांचे शिष्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, टीडीसी बँकेचे माजी संचालक अनंत शिसवे, ज्येष्ठ समाजसेवक सुरेश पाटील, कार्यक्रम समन्वयक सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, डॉ. निलेश म्हात्रे, डॉ. निलेश पाटील, डॉ. हरिद्वार पाटील, डॉ. तपन पाटील,डॉ.दिनेश म्हात्रे,डॉ.जयेश शेळके, सचिन पाटील, पत्रकार सुभाष मुंढे, पंकज व राकेश पाटील, डॉ.शोभा पाटील, डॉ.सुनीता पाटील, डॉ.मयुरी शेलार, डॉ. करुणा पाटील, पल्लवी मढवी, वृषाली म्हात्रे, स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रज्ञावंत साहित्यिक शारदासुत सुनील म्हसकर, गीतकार सुनील पाटील, कवी जयंत पाटील आदी विशेष निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक सकाळ वृत्तपत्र समूह तर प्रायोजक चितळे बंधू व पी. एनजी ज्वेलर्स होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रवींद्र शिसवे साहेब यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात गझलनवाज भीमराव पांचाळे, सुप्रसिद्ध गायिका डॉ.भाग्यश्री पांचाळे यांनी आपल्या सुमधुर आवाजात अतिशय सुंदर अशा बोधपर गझला सादर करून रसिकांची मने जिंकली.
द्वितीय सत्रात सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी खेळकर आणि विनोदी शैलीने सुप्रसिद्ध राष्ट्रीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची मुलाखत घेऊन नागराज मंजुळे यांचा सहजपणे जीवनपट उलगडला.
तृतीय सत्रात ‘ सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील मल्हार रागातील सुंदर सुंदर बंदिशी सादर केल्या तसेच ‘देवाचिये द्वारी उभा क्षण भरी’ हा अभंग तसेच भैरवी रागातील संत सावता माळी यांचा ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी…’ हा अभंग आणि विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल हा विठ्ठलाचा गजर नादमधुर आवाजात सादर करून सर्व श्रोत्यांना तल्लीन केले, भक्तिरसात डुंबविले तसेच सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले…
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉ.रवींद्र शिसवे त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून संपन्न झालेल्या ‘ध्यास उत्तमाचा’ या कार्यक्रमाबाबत भरभरून कौतुक, प्रशंसा व अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्या अपर्णा पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!