पुणे, 14 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मोफत तिकीट दिलं नाही म्हणून नाटक कसं होतं बघतो अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचा प्रयोग झाल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेक्षकांसमोर येत ही घटना सांगितली. तसेच याचे व्हिडीओ ट्वीट करत माहिती दिली.
अमोल कोल्हे म्हणाले, “प्रामाणिकपणे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, आतापर्यंत संभाजीनगर, नाशिक, निपाणी, कोल्हापूर, कराड या प्रत्येक ठिकाणी पोलीस बांधवांनी प्रचंड सहकार्य केलं. नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांनी तर २ हजार ५०० पोलीस बांधवांना त्यांच्या कुटुंबासह या महानाटकाचं तिकिट काढून दाखवलं. मात्र, आज मी खेदाची बाब शेअर करण्यासाठी आलो आहे.”
