उर्वरित कामे वेगाने पूर्ण करा : आयुक्त इकबाल सिंह चहल यांची सूचना

मुंबई : मुंबई सुशोभीकरण प्रकल्पातील ५० टक्के कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण झाली असून उर्वरीत कामेदेखील ठरलेल्या वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे पावसाळापूर्व कामांचादेखील आपआपल्या पातळीवर आढावा घेऊन या कामांना गती द्यावी. विशेषतः नाले सफाईच्या कामांना परिमंडळ उपआयुक्त आणि सहायक आयुक्तांनी भेटी देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. लवकरच त्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरदेखील बैठक घेण्यात येईल, अशी सूचनादेखील चहल यांनी केली.

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाचा आढावा घेताना आयुक्त चहल म्हणाले की, पहिल्या टप्प्यात ५०० तर दुसऱ्या टप्प्यात ३२० व इतरही अतिरिक्त अशी एकूण १ हजार ०७७ कामे हाती घेतली आहेत. पैकी ६१३ कामे पूर्ण झाली आहेत म्हणजे ५० टक्के कामे ठरल्याप्रमाणे मार्च अखेर पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर असून ती देखील नियोजित वेळापत्रकाप्रमाणे विशेषतः पावसाळा सुरु होण्याआधी पूर्ण करावीत, विद्युत रोषणाई संबंधी कामे येत्या महिन्यात पूर्ण करावीत, अशी सूचना आयुक्तांनी केली. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील लहान-मोठ्या सर्व नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने आणि योग्यरितीने पूर्ण करावीत, आपल्या विभागातील नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निर्देश आयुक्त चहल यांनी दिले. प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर पावसाळापूर्व कामांची लवकरच बैठक घेतली जाईल असे नमूद करुन मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यात कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठीची सर्व ती खबरदारी घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची १११ कामे हाती

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा एक भाग म्हणून रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची १११ कामे हाती घेतली आहेत. या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आगामी काळात प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत, असे सांगून काँक्रिटीकरणासह रस्त्यांची इतरही सर्व कामे योग्यरितीने होत आहेत, याकडे रस्ते विभागाने लक्ष ठेवावे, अशी सूचना आयुक्तांनी केली. मुंबईत ५ हजार स्वच्छतादूत नेमण्याच्या दृष्टीने धोरण ठरल्यानंतर आता स्वच्छता दूतांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे, ही समाधानकारक बाब आहे. एप्रिल अखेरपर्यंत सर्व स्वच्छतादूत नेमले जातील, अशा रितीने प्रक्रिया वेगवान पद्धतीने राबवावी, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

मुंबईत विभागनिहाय होणार मातृशक्ती महिला मेळावे

राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मुंबई शहर व उपनगरांमध्ये सरकार आपल्या द्वारी – मातृशक्ती महिला मेळावे दिनांक १४ एप्रिलपासून आयोजित होणार आहेत. महिला मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार असून महिलांच्या सूचना, तक्रारी ऐकून घेण्यात येतील. महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावे, तसेच महिला मेळाव्यांच्या समन्वयसाठी प्रत्येक विभाग कार्यालय स्तरावर एका महिला अधिकाऱयाची नेमणूक करावी, अशी सूचनाही आयुक्तांनी या बैठकीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *