विद्यार्थी सादर करणार स्वरचित कविता
ठाणे : विद्यार्थी दशेतच मुलांना साहित्याची गोडी निर्माण व्हावी, त्यांना साहित्याचे महत्व कळावे या उद्देशाने शनिवारी ७ जानेवारी २०२३ रोजी ठाण्यातील कळवा येथील ज्ञानप्रसारणी शाळेत बाल संस्कार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ठाण्यात होणारे अश्या प्रकारचे हे पहिलेच संमेलन असून, यावेळी विद्यार्थी स्वरचित कविता व काव्याचे अभिवाचन करणार आहेत.
शालेय जीवनाच साहित्याची गोडी विद्यार्थ्यांना लागावी, वाचन लेखनात त्यांची प्रगती व्हावी, यातूनच उद्याचे कवी, लेखक निर्माण होण्यास हातभार लागावा, या संकल्पनेतून कळवा येथील ज्ञानप्रसारणी संस्थेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना कविता वाचन आणि अभिवाचनाचे धडे देण्यात आले. या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांची भाषाविषयक गोडी वाढली असून, जवळपास ६०हुन अधिक विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता व काही विद्यार्थ्यांनी लेख लिहिले असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले.
विद्यार्थ्यांचा हा उत्साह आणि विषयातील आवड पाहून, ज्ञानप्रसारणी शाळेने शनिवारी ७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत एक दिवसीय बाल संस्कार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनात तुतारी, लेझीम पथक, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी यांच्या सहभागातून साहित्य दिंडी निघणार आहे. त्यांनतर विद्यार्थ्यांनी स्वतः रचलेल्या कविता व काव्य वाचन असे या संमेलनाचे स्वरूप असणार आहे.
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक, कवी, पत्रकार व दैनिक ठाणे वैभव चे मुख्य संपादक मिलिंद बल्लाळ असणार आहेत. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याकरिता अनेक मान्यवर कवी, लेखक, पत्रकार या संमेलनात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या साहित्य संमेलनाची सर्व सूत्रे विद्यार्थी वर्गाकडे राहतील.
कवी, लेखक बाळ कांदळकर आणि ज्ञानप्रसाराणीचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब खोल्लम यांच्या संकल्पनेतून हे बाळ संकर साहित्य संमेलन आकार घेत असून, यात पालक वर्गही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. इच्छुक साहित्य रसिक मंडळींनी या संमेलनास उपस्थित राहावे असे आव्हान संस्थेचे कार्याध्यक्ष भालचंद्र जोशी व सचिव अनिल कुंटे यांनी केले आहे.