ठाणे : आदिवासींना वन हक्क डावलून त्या वन जमिनी बिल्डरांच्या व राजकीय लोकांच्या घशात घालण्याचा डाव आखला जात आहे. त्याच्या निषेधार्थ आणि आदिवासींना वन हक्क पट्टे प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी आदिवासी बांधवांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव लहान मुलांसह सहभागी झाले होते.
आदिवासी हक्काचे गाव, पाडे, टोले, व कोळी वाडे, पूर्वापाड परंपरागत ठाणे, मुंबई शहरात वसलेले आहेत, मुळ रहिवासी असलेल्या आदिवासींना वन हक्क डावलून त्या वन जमीनी बिल्डरांच्या व राजकीय लोकांच्या घशात घालण्याचे काम सुरू आहेत, त्याच्या निषेधार्थ आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले. वन हक्क समिती कोकणीपाडा ठाणे यांच्यावतीने ठाणे जिल्हा धिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वन हक्क, वन पट्टे मिळालेच पाहिजे…….वन हक्क आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे…. असे फलक घेऊन व घोषणाबाजी करीत आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. महिलांसह लहान मुले मोर्चात सहभागी झाले होते.
ठाणे महापालिका क्षेत्रातील ” कोकणीपाडा ” या आदिवासी वन गावातील वन हक्क दावे मंजूर होऊन ३ वर्षे होत आहेत मात्र जिल्हा प्रशासनाकडून वन पट्टे प्रमाणपत्र वाटप केले जात नाही. आदिवासी समाजाची घोर फसवणूक होत आहे. मोठा अन्याय सहन करावा लागत आहे असा संताप आदिवासी बांधवांकडून व्यक्त करण्यात आला. वन हक्क समिती कोकणीपाडा, वन हक्क समिती येऊर पाटोनापाडा, वन हक्क समिती वागळे स्टेट, व इतरही आदिवासी संस्था, संघटना, यांनी आयोजन करून आदिवासींच्या जमीनी हक्क मिळवण्यासाठी सहभाग घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले आहे. या मोर्चाला मातृभूमी आदिवासी सेवा भावी संस्था, महाराष्ट्र राज्य आणि ठाणे गावठाण, कोळीवाडे, पाडे संवर्धन समिती यांनी जाहीर पाठींबा दिला.
कोकणीपाडा, येऊर, पाटोनापाडा, भेंडीचापाडा, जाभूंळपाडा, चिराग नगर, वागळे स्टेट जुना गांव, वारली पाडा, व वागळे स्टेट परिसर, आदि करून पालघर जिल्हा ठाणे जिल्हा, मुंबई जिल्हा, आरे कॉल नी , कोळी वाडे, कोळी समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी यांनी आपल्या मोर्चा ची व्यथा व आक्रोश शासनास अवगत करून, येत्या १५ जुन पर्यंत वन हक्क वन पट्टे वाटप करण्याचे आश्वासन दिल्याचे मोर्चाचे आयोजक जयराम राऊत यांनी सांगितले. यावेळी मोर्चात मनिष मोकळे, प्रभू चौधरी, नंदू भुसारे, महेश महाले,शंकर चौधरी, भरत चौधरी, लहू दळवी, परशुराम दळवी, महादेव गावित, अनुसया महाले, सुरेखा पाणी, सूदंराबाई महाले, चांगुणा मोकाशी, मनोहर कुरकूटे, दीपक महाले, वन हक्क समिती चे सर्व सदस्य कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.