शेतकरी कर्जमाफीसाठी आतापर्यंत ५६ लाख शेतक-यांचे अर्ज

22 सप्टेंबर पर्यंत मुदत 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मंगळवारी दुपारपर्यंत 56 लाख 7 हजार 883 शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 22 सप्टेंबर पर्यंत आहे. या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. बँकांनी सुद्धा वेळेत कर्ज माफीसाठीची सर्व माहिती, माहिती तंत्रज्ञान विभागाला उपलब्ध करुन द्यावी, अशी चर्चा मंगळवारी मंत्रालयात पार पडलेल्या उपसमितीच्या बैठकीत करण्यात आली.
मंत्रालयात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी ही चर्चा करण्यात आली. सर्व बँकांनी कर्जमाफीसाठी लागणारी सर्व माहिती, माहिती तंत्रज्ञान विभागाला वेळेत उपलब्ध करून द्यावी . तसेच बँकांकडून संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाने तपासणी करावी. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर ज्या जिल्ह्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी चर्चा यावेळी करण्यात आली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!