डोंबिवली : आमच्याकडे गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला दर महिन्याला 20 टक्के परतावा दिला जाईल, असे अमिष दाखविणाऱ्या डोंबिवलीतील दोन बदमाशांनी गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत डोंबिवलीसह मुंबई परिसरातील गुंतवणूकदारांकडून ४४ लाख रूपये उकळले. गुंतवणूकदारांना मूळ रक्कम नाहीच, शिवाय वाढीव व्याज न देता फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली आहे.

 केतन पवार (रा. प्रकाश प्रतीमा सोसायटी, खोली क्र. 205, गरीबाचा वाडा, डोंबिवली-पश्चिम) आणि प्रतीक रेमणे (रा. मायमाऊली सोसायटी, गावदेवी मंदिराजवळ, मानपाडा रोड, डोंबिवली-पूर्व) अशी आरोपींची नावे आहेत. मुंबईतील जोगेश्वरी भागात मेघवाडी येथे राहणारे अनिकेत अशोक तावडे (34) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुंतवणूकदार तावडे यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. ऑक्टोबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी केतन पवार आणि प्रतीक रेमणे यांनी डोंबिवलीसह मुंबई परिसरातील अनेक गुंतवणूकदारांकडून दरमहा 20 टक्के गुंतवणुकीवर व्याज देण्याची योजना तयार केली. या योजनेची माहिती परिचितांना दिली. दरमहा 20 टक्के व्याज मिळणार असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी या योजनेत गुंतवणूक केली. दरमहा व्याज मिळणे क्रमप्राप्त असताना गुंतवणूकदारांना दरमहा व्याज देण्यास आरोपी टाळाटाळ करू लागले.

 सहा महिने उलटूनही आरोपी गुंतवणुकीवर वाढीव व्याज देत नसल्याचे पाहून ग्राहकांनी त्यांच्या मूळ रकमेसाठी तगादा लावला. त्याला आरोपींनी प्रतिसाद दिला नाही. आरोपी ग्राहकांच्या संपर्काला प्रतिसाद देणे टाळाटाळ करू लागले. आपली फसवणूक झाल्याची खात्री गुंतवणूकदार अनिकेत तावडे यांच्या पुढाकाराने गुंतवणूकदारांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग पिठे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!