डोंबिवली : हॉलिवूडच्या प्रेक्षकांना ‘झॉम्बीं’ हे प्रकरण नवं नाही. बॉलीवूडमध्येही यापूर्वी झोंबीपट झाले आहेत. त्याच धर्तीवर झोंबिवली हा नवा मराठी चित्रपट 26 जानेवारीपासून प्रदर्शित झालाय.या चित्रपटात डोंबिवलीची ‘झोंबी’मय गोष्ट मांडलीय. चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे त्यामुळे सध्या तरी झोंबिवलीची चर्चा डोंबिवलीत रंगल्याची दिसून येत आहे
आपल्याकडे भूतं असतात, हडळ असते, मुंज्या असतो, वेताळ असतो तशी फॉरेनची भुतावळ म्हणजे हे ‘झॉम्बी. आफ्रिकेतल्या हैती जमातींमध्ये या ‘झॉम्बीं’च्या कथा सांगितल्या जातात. तिथल्या लोककथांमध्ये याचा उल्लेख आढळतो. थोडक्यात तिथेच या ‘झॉम्बीं’चा जन्म झाला. तिथून मग वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून हे भयानक ‘झॉम्बी’ जगभरात पोहोचले. मराठीत हा नवा कन्सेप्ट आहे. ‘झॉम्बी’ हे थेट डोंबिवलीत पोहचतात. सिनेमाचं पहिलं टीझर पोस्टर काढल्यानंतर डोंबिवलीचं नाव खराब होईल लोक आता डोंबिवलीला झोंबिवली म्हणून ओळखायला लागतील असे अनेक धमकीवजा सूचना दिग्दर्शकांना सहन कराव्या लागल्या आहेत. अखेर झोंबिवली प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
१९३२ मध्ये झॉम्बीचं पहिलं दर्शन …
१९३२ मध्ये आलेला ‘व्हाईट झॉम्बी’ हा सिनेमा पहिला ‘झॉम्बी’पट मानला जातो. त्यातून पहिल्यांदाच या ‘झॉम्बीं’चं दर्शन जगाला झालं. मात्र अर्थातच त्यातले ‘झॉम्बी’ दिसायला तेवढे भयानक नव्हते. त्यांचं रुप तेवढं विद्रुप नव्हतं. त्यानंतर १९६८ चा ‘नाईट ऑफ लिव्हिंग डेड’ हा सिनेमा आला. जो मॉडर्न ‘झॉम्बी’पट मानला जातो. त्यानंतर पॉपस्टार मायकल जॅक्सनने त्याच्या थ्रीलर या म्युझिक व्हिडिओमध्ये ‘झॉम्बीं’चं दर्शन घडवलं. ‘ट्रेन टू बुसान’मुळे तर हे ‘झॉम्बी’ भलतेच लोकप्रिय झाले आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले. तर तेच ‘झॉम्बी’ आता थेट मुंबईजवळच्या डोंबिवलीत पोहोचले आहेत. तर हे ‘झॉम्बी’ डोंबिवलीत कसे आले? कशामुळे आले? आणि त्यामुळं नेमकं काय काय घड़लं हे सगळं म्हणजे आदित्य सरपोतदारने दिग्दर्शित केलेला ‘झोंबिवली’ हा सिनेमा आहे .
डोंबिवलीकरांना चित्रपट कसा वाटला नक्की कमेंट करा …..
‘झोंबिवली’च्या निमित्तानं मराठीत एक वेगळा प्रयोग दिग्दर्शक आदित्य सरपोतदारनं केला आहे. चित्रपटात अभिनेता अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर हे प्रमुख भूमिकेत आहेत. पुनर्वसन, बिल्डरकडून होणारी फसवणूक आणि रहिवाशांचा पाणीप्रश्न. या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या डोंबिवलीची ‘झोंबी’मय गोष्ट त्यानं मांडलीय. हॉलिवूड चित्रपटात पाहिलेले झोम्बी खरंच डोंबिवलीत आल्यावर काय होतं हे या चित्रपटात विनोदी- थरारक अंदाजात दाखवण्यात आलंय. आपल्याला हा चित्रपट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.