मुंबई- खाद्य पदार्थांची घरपोच सेवा पुरविणारी (होम डिलिव्हरी सर्व्हिस)अग्रगण्य कंपनी झोमॅटोने मंगळवारी ‘शुध्द शाकाहारी’ अशी नवीन सेवा सुरू केली आणि लगेचच नव्या वादाला तोंड फुटले.झोमॅटोच्या या नव्या सेवेमुळे शाकाहारी आणि मांसाहारींमध्ये आधीच असलेले तेढ अधिक वाढणार असा आक्षेप घेत सोशल मीडिया युझर्सकडून कंपनीवर टीकेचा भडिमार करण्यात आला.
झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी ‘प्युअर व्हेज मोड’ या नावाने शुध्द शाकाहारी पदार्थ स्वतंत्र पध्दतीने घरपोच दिले जातील अशी घोषणा केली. शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांच्या घरपोच सेवेसाठी या नव्या योजनेनुसार स्वतंत्र कामगारवर्ग (डिलिव्हरी बॉय) असणार आहेत. झोमॅटोच्या सर्व डिलिव्हरी बॉयजचा लाल रंगाचा टी-शर्ट असतो. त्यामुळे हे डिलिव्हरी बॉयज लांबूनही ओळखता येतात. त्यांच्याकडे खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी दिलेला बॉक्सही लाल रंगाचा असतो. मात्र शुध्द शाकाहारी पदार्थांची ने-आण करणाऱ्या डिलिव्हरी बॉयजना हिरव्या रंगाचा टी-शर्ट देण्याचे झोमॅटोने ठरविले आणि तसे जाहीरही केले .त्यांच्याकडे असलेला बॉक्सही हिरव्या रंगाचा असणार होते .जे ग्राहक शुध्द शाकाहारी आहेत त्यांच्या समाधानासाठी झोमॅटोने ही सेवा सुरू केली.
मात्र हिरव्या रंगाच्या टी शर्ट देण्यावरून वाद सुरू झाला आणि अखेर वेगळा रंग वापरण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला . वाद होण्याचे कारण म्हणजे हिरवा रंग शाकाहारी आणि लाल रंग मांसाहारी जेवण असा फरक केल्याने लाल टी-शर्ट घातलेला झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय हा मांसाहारी पदार्थांची डिलिव्हरी करतो हे सहज कळून आले असते. मुंबईत अशा अनेक सोसायटया आहेत की जिथे शाकाहारी लोकांचे प्रमाण जास्त आहे. पण कमी प्रमाणात का होईना तिथे मांसाहार करणारे लोकही राहतात. त्यांनी जर मांसाहारी पदार्थाची ऑर्डर झोमॅटोला दिली तर त्याचा शर्टाच्या रंगामुळे विनाकारण बभ्रा सोसायटींमध्ये होऊ शकतो. त्यामुळेच बहुतांश नेटकऱ्यांनी झोमॅटोला कडाडून विरोध केला. त्यामुळे झोमॅटोने अखेर माघार घेतली .