डोंबिवली : डोंबिवली ग्रामीण येथून पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर काल ट्रॅक्टर सोबत भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात जाऊन युवा सेनेचे सचिव दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी भेट घेतली.
डोंबिवली ग्रामीण परिसरात राहणारे हे भाविक गेली २५ वर्षे आषाढी वारीनिमित पंढरपूरला जात होते. काल अचानक झालेल्या अपघातात ५ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तर ७ प्रवासी हे गंभीररीत्या जखमी आहेत तर २३ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची डॉक्टरांकडून माहिती घेतली.
या दुर्घटनेत जीव गमवावा लागलेल्या प्रवाशांच्या कुटूंबियांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर जखमी झालेल्यांवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील असेही स्पष्ट केलं आहे.