आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने रोजगार मेळाव्याचे आयोजन
कल्याण दि.26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार आपल्या दारी उपक्रमामध्ये तब्बल शेकडो जणांना नोकऱ्या प्राप्त झाल्या. ज्यामध्ये काही शासकीय विभागातील पदांचाही समावेश असून निवड झालेल्या उमेदवारांना याठिकाणी लगेचच नियुक्ती पत्रंही देण्यात आली. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. ज्यामध्ये नवी मुंबई, सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर आणि ठाणे कल्याण भागातील 45 हून अधिक नामांकित खासगी कंपन्यांचा सहभाग होता. बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, ई कॉमर्स, हॉटेलिंग, ओव्हर सीज आदी प्रमूख क्षेत्रातील ४ हजारांहून अधिक रिक्त पदांसह शासकीय विभागातील काही निवडक पदेही या मेळाव्याच्या माध्यमातून भरण्यात आली.
मेळाव्याला तरुण तरुणींची तूफान गर्दी…
कल्याण पश्चिमेच्या वायले नगर येथील साई हॉलमध्ये झालेल्या या रोजगार मेळाव्यासाठी कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील तरुण- तरुणींची तूफान गर्दी झाली होती. याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक स्टॉलवर इंटरव्ह्यूसाठी अक्षरशः रांग लागली होती.
अशा प्रकारचा इतका भव्य मेळावा आयोजित करून आमदार विश्वनाथ भोईर यांनी आमच्यासारख्या इच्छुक उमेदवारांसाठी खूप मोठी संधी प्राप्त करून दिली आहे. आपल्यासारख्या सामान्य युवकाला शासकीय विभागात नोकरी मिळणे म्हणजे खरोखर स्वप्नवत असल्याची प्रतिक्रिया मयूर पाटील या युवकाने दिली.