कल्याण : कल्याण पश्चिमेतील योगीधाम भागात शनिवारी रात्री साडेअकरा वाजता मित्रांसोबत गरबा खेळत असलेल्या एका 19 वर्षाच्या तरूणावर टावरीपाडा भागातील तरूणाने धारदार कोयत्याने हल्ला केला. त्याला गंभीर जखमी करून हल्लेखोर पळून गेला. हल्लेखोराने पूर्ववैमनस्यातून या तरुणावर कोयत्याने वार करून पलायन केले. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आशिष राजू पाटील असे जखमी तरूणाचे नाव आहे. तो बापगाव येथे एका रक्तपेढीत नोकरी करतो. मिलिंद नगरमधील टावरे निवास इमारतीत राहणारा आशीष पाटील हा नवरात्रौत्सव सुरू असल्याने शनिवारी रात्री साडेअकरा वाजता आपल्या मित्रांसमवेत योगीधाम येथील संघर्ष मित्र मंडळाच्या गरबा उत्सवात गरबा खेळत होता. आशिष या ठिकाणी असल्याची माहिती टावरी पाड्यात राहणारा दीपेश दिलीप गायकवाड उर्फ हड्डी याला मिळाली होती.
काही वर्षांपूर्वी काही कारणांवरून आशिष याने दीपेशच्या वडिलांना किरकोळ कारणावरून मारहाण केली होती. त्याचा राग दीपेशच्या मनात होता. शनिवारी रात्री दीपेश योगीधाम येथे गरबा पाहण्याचे निमित्त करून आला. त्याने कोयता शर्टाखाली लपून ठेवला होता. गरबा खेळण्यात दंग असतानाच दीपेशने पाठीमागून जाऊन आशिषवर कोयत्याने सपासप वार केले. आशिष रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे पाहून हल्लेखोर दीपेश याने तेथून पळ काढला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे गरबा खेळणाऱ्यांची भीतीने गाळण उडाली. ऐन गरब्यात साऱ्यांची पळापळ झाली. तेथील काहींनी जखमी आशीषला तातडीने जवळच्या दवाखान्यात नेले. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस फरार हल्लेखोर दीपेश गायकवाड उर्फ हड्डी याचा शोध घेत आहेत.