मुंबई : शिक्षक भरती करावी या मागणीसाठी तरुणाने मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केले. त्यानंतर गृहविभाग अॅक्शन मोड आले आहे. मुंबईतल्या मंत्रालयामध्ये वारंवार होणारे आत्महत्येचे प्रयत्नावर आळा घालण्यासाठी गृहविभागाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलीय. मंत्रालयात येणाऱ्या सर्व व्यक्तींना प्रवेश पास हा बंधनकारक असणार आहे. तसेच मंत्रालयात येणाऱ्या विजिटरसाठी गार्डन गेट येथे अद्यावत सुरक्षा तपासणी कक्ष केले जाणार आहे.
शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर राबण्यात यावी, तसेच कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया घेण्यात येऊ नये, अशा मागण्या या युवकाने केल्या आहेत. या मागण्यांसाठीच मंत्रालयातील संरक्षण जाळीवर या तरुणाने उडी मारत आंदोलन केले. या तरुणाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर मंत्रालयामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला तातडीने ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
मागील महिन्यातही अमरावती येथील अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयामधील सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. आता बीडच्या आंबाजोगाई येथून आलेल्या तरुणाने शिक्षक भरती करावी या मागणीसाठी सुरक्षा जाळीवर उडी मारत आंदोलन केलं. यानंतर गृहविभाग अॅक्शन मोड आली असून मंत्रालयात येणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या सुचनेनुसार, प्रत्येक व्हिजिटरसाठी पास घेणं आवश्यक केलं आहे. मंत्रालयात येणाऱ्यांसाठी १५ दिवसात ऑनलाईन पासेस देण्याची सुविधा सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आलेत. मंत्रालयाच्या आतील आणि बाह्य परिसराची सीसीटीव्ही मार्फत सतत निगराणी ठेवण्यात येणार आहे. संरक्षक जाळी ओलांडून प्रवेशाचा प्रयत्न होत असल्यास त्याबाबत अलर्ट संदेश देणारी कार्यप्रणाली बसवण्यात येणार आहे.
मंत्रालय सुरक्षेसाठी कार्यन्वित असलेली ड्रोन यंत्रणा सुस्थितीत ठेण्याबाबत सूचनाही गृह विभागाने दिल्या आहेत. तसेच वारंवार मंत्रालयात प्रवेश करणाऱ्यांची कारणांची यादीदेखील तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्यात आहे. याचबरोबर मंत्री आणि सचिवांच्याच गाड्यांना प्रवेश राहणार आहे. तर खासगी गाड्यांसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. मंत्रालयामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या ५ हजार पेक्षा जास्त आहे. त्यामुळे मंत्रालयात यापुढे किती व्यक्तींना प्रवेश देण्यात यावे, याबाबत पोलीस उपायुक्त मंत्रालय सुरक्षा यांना सूचना देण्यात आल्या आहेत.