डोंबिवली : सांस्कृतिक व उत्सवांचं शहर म्हणूनच डोंबिवलीची ओळख… गुडीपाडवा असो की दिवाळी शहराची सांस्कृतीक ओळख असणा-या फडके रस्त्यावर तरुणाईची जणूकाय लाटच उसळते. दिवाळी पहाट आणि फडके रोड यांचे अनोखे नातं, तरुणाईच्या उपस्थितीने फडके रोड दरवर्षी नव्याने बहरतो. पण गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे फडके रोड ओस पडला. यंदा कोरोना निर्बंध शिथील करण्यात आल्याने तरूणाईने बाप्पाचे दर्शन घेत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी फडके रोड परिसरात तरुण तरुणी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमतात. फडके रोडवर दिवाळी पहाट सारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रोषणाई आणि मोठी रांगोळी. तसेच ढोल पथके लेझीम पथके आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम इथे होत असतात . तरुण तरुणी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी हजारो तरूण तरूणी गर्दी करतात. मात्र दिवाळी सणानिमित्त तरुणांच्या या उत्साहावर कोरोनाने मात्र विरजण घातलय. गेल्या वर्षी कोरोनामुळे फडके रोडवर तरूणांना उत्साहात उत्सव साजरा करता आला नाही यंदा देखील कोरोना निर्बंध शिथील असले तरी सुध्दा कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाही. याठिकाणी जमावबंदी लागू केल्याचे फलक पोलीसांनी लावल्याने तरुणाईची यंदाची दिवाळीही फडके रोडविनाच साजरी करावी लागली. सकाळीच तरुण-तरुणी नागरिक या ठिकाणी आले मात्र गणपती मंदिरातून दर्शन घेऊन पुन्हा माघारी फिरत होते.