मुंबई, दि. 29 : साहित्य व सिनेमा एकमेकांना पूरक आहेत. साहित्यिक व चित्रपट निर्माते समाजाला त्याचे प्रतिबिंब दाखवून अंतर्मुख करतात. मात्र समाजातील वास्तव व विसंगती दाखवताना त्यांनी एक अभिरुची संपन्न समाज निर्मितीसाठी विशेषत्वाने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. यथाकथा’ या पहिल्या ४ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट व साहित्य महोत्सवाचा समारोप राज्यपालांच्या उपस्थितीत रविवारी (दि. २८) विले पार्ले मुंबई येथील मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला यथाकथा चित्रपट व साहित्य महोत्सवाच्या संस्थापिका चारू शर्मा, नानावटी महाविद्यालयाचे विश्वस्त अपूर्वा नानावटी, राजपिपला घराण्याचे युवराज मानवेंद्र सिंह गोहिल, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट परीक्षक व स्तंभलेखक पियुष रॉय तसेच साहित्य व चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

साहित्य, संगीत, नाटक, सिनेमा, परीक्षण हे सर्व कलेचेच अविष्कार आहेत. जो आनंद आध्यात्मिक साधक व सिद्ध परमात्म साधनेतुन प्राप्त करतात, तोच आनंद लेखक, कवी व संगीतकार आपल्या उत्कृष्ट निर्मितीतून घेत असतात व समाजाला देत असतात, असे राज्यपालांनी सांगितले. ईश्वराने मनुष्याला प्रेम, दया, सहानुभूती या भावना दिल्या असून त्यामुळे मनुष्य स्वतःला उन्नत करू शकतो. भारताने जगाला रामायण, महाभारत, कालिदासांच्या अजरामर कृतींसारखे श्रीमंत साहित्य दिले असून साहित्यिकांनी नीतिमूल्ये व श्रद्धा वृद्धिंगत करणारे साहित्य दिल्यास त्यातून समाजाला मनोरंजनासोबत संस्कार देखील मिळतील, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते अभिनेते मनोज कुमार तसेच बाल साहित्यातील पितामह रस्किन बॉण्ड यांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उभय व्यक्ती प्रभृती उपस्थित राहू शकल्या नाहीत. संस्कृत विद्वान राधावल्लभ त्रिपाठी यांना देवभाषा संस्कृत सम्मान देण्यात आला तर हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी सिंगापूर येथील ग्लोबल हिंदी फाऊंडेशनच्या संस्थापक ममता मंडल यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मिती तसेच साहित्यिकांचे देखील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!