यामिनी जाधव, रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर
मुंबई, दि. ३०ः मुंबईच्या जागा वाटपावरून महायुतीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. या दोन्ही जागा सेनेकडे रोखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं. शिवसेनेकडून दक्षिण मुंबई मतदारसंघातून यामिनी जाधव तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर यांना मंगळवारी अधिकृत उमेदवारी जाहीर केली. मात्र ठाणे लोकसभा मतदार संघाचा उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही त्यामुळे ठाण्याचा तिढा कधी सुटणार ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदार संघावर भाजपने दावा केला होता. त्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. भाजपकडून अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र शिवसेनेने हे मतदार संघ आपल्याकडे राखण्यात यश मिळालं.
कोण आहेत यामिनी जाधव
यामिनी जाधव या उपनेते यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर मुंबई महापालिकेतील घोटाळ्याचा आरोप केला होता. ईडीच्या चौकशीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै २०२२ मध्ये ४० आमदारांसह बंड करत शिवसेनेत फूट पाडली. यावेळी आमदार यामिनी जाधव यांनी शिंदेंची साथ दिली होती. या मतदार संघातून शिवसेना ठाकरे पक्षाने अरविंद सावंत यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे यामिनी जाधव यांचा अरविंद सावंत यांच्याशी होणार आहे.
जोगेश्वरीतील राखीव भूखंडाच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी भाजपने केलेल्या गंभीर आरोपामुळे रवींद्र वायकर गोत्यात आले. ईडीने देखील वायकर यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावला. सततच्या चौकशीला कंटाळून वायकर यांनी १० मार्चला शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली. शिवसेना (ठाकरे) अमोल किर्तीकर यांना येथून उमेदवारी दिली आहे. शिवसेना नेते विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे ते चिरंजीव आहेत.
कल्याण आणि ठाणे या दोन लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. कल्याणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र डॉ श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत तर शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे हे खासदार आहेत. कल्याण व ठाणे दोन्हींपैकी एक मतदार संघ भाजपला मिळावा अशी त्यांची मागणी आहे तर दोन्ही मतदार संघावरील दावा सोडण्यास शिवसेना शिंदे गट तयार नाही त्यामुळे या दोन्ही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कल्याणातून डॉ श्रीकांत शिंदे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी सुध्दा श्रीकांत शिंदे हे उमेदवार असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या अधिकृत घोषणेची औपचारीकता उरली आहे. मात्र ठाण्याचा तिढा अजूनही सुटलेला नाही. कल्याण ठाण्याची निवडणूक येत्या २० मे रोजी होत आहे. त्यामुळे ठाण्याच्या उमेदवाराची घोषणा कधी होते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.