ठाणे : बदलती जीवनशैली, अनियमित व्यायाम, खाण्यात जंकफूडचे वाढते प्रमाण, लठ्ठपणा आणि उपचाराकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे मधुमेह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याची माहिती डॉ. कुशल मित्तल यांनी दिली.
ठाण्यात आयएमए असोसिएशनच्या वतीने घंटाळी येथील सहयोग मंदिरात जागतिक मधुमेह दिनानिमित्त विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात विविध क्षेत्रांतील नामांकित डॉक्टर सहभागी झाले होते. यावेळी डॉ. मित्तल यांनी मधुमेह आणि पायावर होणारे दुष्परिणाम या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अनेकदा मधुमेही रुग्ण उपचाराकडे दुर्लक्ष करतात. समाज माध्यमांचा वापर करून स्वतः च घरच्या घरी उपचार करतात. त्यामुळे रुग्णांवर त्याचे दुष्परिणाम होऊन पायावर शस्त्रक्रिया करावी लागते. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी अनेकदा पायही कापावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे रुग्णांनी वेळीच उपचार घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी रुग्णांनी स्वतः उपचार टाळून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या परिसंवादात विविध क्षेत्रांतील डॉक्टरांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.