कल्याणात एका विहिरीने घेतला पाच जणांचा जीव
अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश
कल्याण – कल्याण पूर्वेतील एका विहिरीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या दोन जवानांचाही समावेश आहे. सफाई कामगार कमलेेेश यादव, गुणवंत गोस्वामी, राहुल गोस्वामी हे पितापुत्र आणि प्रमोद वाघचौरे, अनंत शेलार हे अग्निशमन दलातील जवान या पाच जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. या पाचही जणांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी दिले आहेत.
नेतीवली परिसरातील लोकग्रामजवळ ही विहीर असून. शेजारच्या गटाराचं सांडपाणी याच विहिरीत जातं. त्यामुळे विहिरीत मोठ्या प्रमाणात विषारी गॅस तयार झाला होता. या विहिरीची स्वच्छता करण्यासाठी आज दुपारी कमलेश यादव हा कामगार आतमध्ये उतरला. मात्र त्याचा गुदमरून मृत्यू झाल्यानं शेजारी राहणारे गुणवंत गोस्वामी आणि त्यांचा मुलगा राहुल गोस्वामी हे त्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरले. मात्र या दोघांचाही विहिरीत गुदमरून मृत्यू झाला. त्यामुळे याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानुसार प्रमोद वाघचौरे आणि अनंत शेलार हे अग्निशमन दलाचे दोन जवान या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी आत उतरले, मात्र धक्कादायक बाब म्हणजे या दोघांचाही आतमध्ये गुदमरून मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवळपास १०० जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संध्याकाळपर्यंत या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या परिसरातील रासायनिक कंपनीतील सांडपाणी गटारात सोडले जाते त्यामुळे गटारातील सांडपाणी विहिरीत जात होते. मात्र ही माहिती महापालिका अधिकाऱ्यांना असूनही त्यांनी याबाबत काहीही उपयोजना न केल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला. याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी शिंदेंनी केली आहे.
**