काऊंटरवरील महिलेचा अतिरेक ; संतप्त प्रवाशांकडून कारवाईची मागणी
कल्याण ; कल्याण स्टेशनला तिकीट काऊंटरवर राड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिकीट काढताना सुट्टे पैसे नसल्याने झालेल्या वादाचा हा व्हिडियो महिला प्रवाशाने तिच्या मोबाईलमधून काढल्याने संतापलेल्या काऊंटरवरील महिला स्टाफने तिला मारहाण केली. कल्याण रेल्वे स्टेशनच्या सात नंबर प्लॅटफॉर्मच्या स्कायवॉकवर असलेल्या तिकीट काऊंटरवर ही घटना घडली आहे. एकीकडे अर्धा तासाच्या गोंधळानंतर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने प्रवासी व तिकीट काऊंटरवरील स्टाफचा वाद मिटला. तर दुसरीकडे काऊंटरवरील महिलेवर कठोर कारवाई करण्याची संतप्त प्रवाशांकडून मागणी करण्यात येत आहे.
सोमवारी सकाळच्या सुमारास कल्याण स्टेशनवर हा प्रकार घडला आहे. सात नंबर प्लॅटफॉर्मवरील स्कायवॉकवर तिकीट काऊंटरवर वाद झाल्यानंतर हाणामारी झाली. प्रवासी महिला तिकीटासाठी रांगेत उभी होती. सुट्ट्या पैशांच्या मुद्यावरून तिचे तिकीट काऊंटरवरील महिलेशी वाद झाला. बघता बघता हा वाद वाढत चालला. या प्रवासी महिलेने तिच्याकडील मोबाईलद्वारे व्हि़डीओ काढण्यास सुरूवात केली. त्यामुळे काऊंटरवरील महिला आणखीच भडकली. तिने प्रवासी महिलेला ऑफीसमध्ये बोलावले आणि चक्क मारहाण केली. कानाखाली मारल्याचे पाहून इतर प्रवाशांनी मध्यस्थी केली. आरडाओरडा करत त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही स्टाफमधील त्या महिला कर्मचाऱ्याने मारहाण सुरूच ठेवली. यामध्ये प्रवासी महिला गंभीर जखमी तर झालीच, शिवाय तिला मोठा मानसिक धक्काही बसला.
अखेर इतर प्रवाशांनी तिकीट काऊंटरवरील महिलेच्या तावडीतून कशीबशी प्रवासी महिलेची सुटका केली. याच दरम्यान लोहमार्ग पोलिस अधिकारी घटनास्थळी आले आणि त्यांनी प्रकरण समजून घेत मध्यस्थी केली. तब्बल अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर पोलिसांच्या मदतीने प्रवासी व तिकीट काऊंटरवरील स्टाफचा वाद मिटला. मात्र प्रवाशांना नेहमीच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. रेल्वे स्टाफला वेळीच समज द्यावी. अन्यथा एखाद्या दिवशी प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होईल आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊन चिघळेल, असा इशारा उद्विग्न प्रवाशांनी दिला.