डोंबिवली : लोकलमध्ये प्रवास करताना महिला सुरक्षित नसल्याचे पून्हा दिसून आले आहे. डोंबिवली ते घाटकोपर दरम्यान धावत्या लोकलमध्ये एका विवाहितेची छेड काढून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. विशेष म्हणजे नवरा सोबत असतानाच हा धक्कादायक प्रकार घडलाय. २३ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला. दरम्यान महिलेने डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या १२ तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. हरिषकुमार सुदुला (वय २७, रा, विक्रोळी पूर्व) असे या आरोपीचे नाव आहे तो विक्रोळी येथे राहतो. या घटनेने पून्हा एकदा महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पून्हा एकदा चव्हाटयावर आला आहे.


या संदर्भात लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला घाटकोपर परिसरात पती आणि मुलांसह राहते. सदर महिला हि आपल्या पती आणि मुलांसह डोंबिवलीतील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. २३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घरी परतण्यासाठी त्यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकातील पाच नंबर फलाटावरून सीएसटीकडे जाणारी लोकल पकडली. जनरल डब्ब्यातून प्रवास करीत असतानाच त्याच डब्ब्यात आरोपी सुदुला प्रवास करत होता. डोंबिवली स्थानकातच डब्यात चढताना त्याने पीडितेची छेड काढली होती. त्यानंतर डोंबिवली ते घाटकोपर दरम्यान लोकलमधील गर्दीचा फायदा घेत, महिलेचा विनयभंग केला.

दरम्यान घाटकोर रेल्वे स्थानकातही डब्यातून उतरताना त्याने त्या महिलेची छेड काढून पसार झाला. मात्र या घटनेनंतर पीडित महिला भयभीत होऊन तिने पतीला घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पीडित विवाहितेने २४ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसानी भादंवि कलम ३५४, ३५४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला.

दरम्यान पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला अवघ्या १२ तासात अटक केली अशी माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!