नागपूर – राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर व शेतकरी आत्महत्या, सरकारी खात्यात वाढलेला भ्रष्टाचार, ड्रग्स माफिया, बेरोजगारी आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आज राज्यात दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. शेतकऱ्यांची विविध समस्यांमुळे झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे. शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील असलेल्या सरकार सोबत चहापाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांप्रति देशद्रोह ठरेल, म्हणून हिवाळी अधिवेशनाच्या आदल्यादिवशी पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सरकारने आयोजित केलेल्या चहापाणी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आल्याची भूमिका घेण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितले. सरकारने ४० तालुक्यात केलेली दुष्काळ मदत ही राजकिय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप दानवे यांनी केला. राज्यातील सर्व तालुक्यात दुष्काळाची मदत जाहीर झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी दानवे यांनी केली आहे.
नागपूर, संभाजीनगर, ठाणे, कळवा व नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधांअभावी दुदैवी मृत्यूच्या घटना घडल्या. आरोग्य विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार माजला आहे. याबाबत सभागृहात आवाज उठविणार असल्याचे दानवे यांनी म्हटले. राज्यात मोठया प्रमाणात उघडकीस आलेले ड्रग्सचे प्रकरण पाहता ड्रग्स निर्मितीचे कारखाने अधिकृतपणे सुरू आहे की काय अशी शंका दानवे यांनी व्यक्त केली. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून सत्ताधारी पक्षाचे नेते प्रचार सरकारी खर्चाने करत असल्याचा आरोप देखील दानवे यांनी यावेळी केला.विदर्भ मराठवाडयात मोठया प्रमाणात शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.
मंत्र्यांची भिन्न विधाने, मुख्यमंत्री खुर्ची वाचविण्यात व्यस्त
सरकारमधील मंत्री यांच्यात ताळमेळ नसून ते सतत वेगवेगळी विधाने करतात, मुख्यमंत्री यांच त्यांच्यावर नियंत्रण नसून ते खुर्ची वाचविण्यात व्यस्त असल्याची टीका दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.