मुंबई : राज्य विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी हजेरी लावली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली होती. पण आता तेच मलिक सत्ताधाऱ्यांबरोबर बसल्याने विरोधक आक्रमक झाले होते. अशातच भाजपाच्या एका नेत्याने नवाब मलिक यांचे हे शेवटचे अधिवेशन असल्याचे म्हटले आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज, गुरुवारपासून नागपुरात सुरुवात झाली. वैद्यकीय जामीनावर कारागृहाबाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे या अधिवेशनाला हजर राहिले आहेत. विधानसभेत ते थेट सत्ताधारी बाकांवर बसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कथित संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळी विरोधात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांना देशद्रोही म्हटले होते. पण तेच मलिक आता सत्तेत सहभागी झाले असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे.
फडणवीस दानवेंमध्ये जुंपली ..
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडवणीस यांना लक्ष्य केले. तर, देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर, ते जेलमध्ये असतानाही तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढले नाही, याचे उत्तर आधी द्या नंतर आम्हाला प्रश्न विचारा, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले. तर, पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपाने केला होता. त्याच संजय राठोड यांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेणारे देवेंद्र फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते, असा प्रश्न विचारतात? देवेंद्रभाऊ सरडासुद्धा आत्महत्या करेल हो, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.