मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठया घडामोडी होत असतानाच गुरूवारी मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मनसे नेते अभिजीत पानसे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच भेटीने आता उध्दव – राज एकत्र येणार असल्याच्या चर्चेला बळं मिळतं आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे राज ठाकरेंना टाळी देणार का ? असा सवाल उपस्थित होत आहेत.
मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा सकाळपासून रंगली आहे. अभिजित पानसे हे युतीचा प्रस्ताव घेऊन संजय राऊत यांच्या भेटीसाठी गेले होते. सामना कार्यालयात या दोघांची चर्चा झाली. भांडूप ते दादर पर्यंत पानसे आणि राऊत यांनी एकत्रीत गाडीने प्रवास केला. त्यानंतर पानसे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी तर राऊत हे उध्दव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी पोहचले. दरम्यान अभिजीत पानसे यांनी मनसे- शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राज्याच्या या घडामोंडीमुळे मनसैनिकांनी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रीत यावे अशी बॅनरबाजी केली हेाती.
अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड पुकारत सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसेच्या काही नेत्यांनी पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र यावं असं मत मांडलं. कार्यकर्त्यांच्याही तशा पद्धतीच्या भावना आहेत असं मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांना सांगितलं. राज ठाकरेंना तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची मागणी केली जात असल्यासंबंधी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी काहीही स्पष्ट बोलण्यास नकार दिला. मी महाराष्ट्राचा दौरा करणार असून, मेळावादेखील घेणार आहे. यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर उध्दव राज एकत्र येणार का ? उध्दव ठाकरे राज ठाकरेंना टाळी देणार का ? असा प्रश्न उपस्थित होत असून याकडे राज्याचे लक्ष वेधले आहे.