मुंबई : शिवसेनेच्या (ठाकरे) दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर परवानगी मिळाल्यानंतर, आता शिवसेना (शिंदे) आझाद मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र आझाद मैदान हे आंदोलनासाठी राखीव असल्याने त्यासंदर्भात न्यायालयाच्या अटी-शर्ती असल्याने शिंदेंना आझाद मैदानात परवानगी मिळणार का ? असा प्रश्न आहे. त्यामुळे महापालिका प्रशासना पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे लक्ष वेधले आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर पक्षात दोन वेगवेगळे दसरा मेळावे हेात आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शिवाजी पार्क मैदानावरून वाद निर्माण झाला हेाता. पण शिंदे गटाने माघार घेतल्याने महापालिकेकडून ठाकरे यांना परवानगी दिली आहे. मागील वर्षी ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला होता. तर शिंदेचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये पार पडला होता. यावेळी शिंदे गटाकडून मैदानाची शोधाशोध सुरू आहे.
यंदा मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळयासमोर ठेवून मुंबईतील केंद्रबिंदू असलेल्या आझाद मैदानावर दसरा मेळाव्यासाठी घेण्यासाठी शिंदे गट इच्छूक असून परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे आझाद मैदानात आंदोलन, उपोषण होत असतात. त्यासाठी न्यायालयाने काही अटी शर्ती, नियम आणि निकष ठरवले आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी या अटी शर्थी अडचणीच्या ठरू शकतात. त्यामुळे प्रशासनाकडून कसा मार्ग काढला जातो. आझाद मैदानात शिंदेचा दसरा मेळावा होणार का, असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.
या आहेत अटी शर्ती
१ मुंबई उच्च न्यायालयाने ८ डिसेंबर १९९७ रोजी दिलेल्या आदेशानुसार दक्षिण मुंबईत मोर्चा धरणे आणि आंदोलनाकरता आझादा मैदानातील बॅरिकेडसने दर्शविलेल्या जागेतच आंदोलन करावे.
२ भडकाऊ भाषण करण्यास बंदी आवाजाची मर्यादा ५० डेसिबलपर्यंत असावी
३ कार्यक्रमात लहान मुले गरोदर स्त्रिया अथवा वृध्द व्यकतींना सहभागी केले जाणार नाही.
४ सामाजिक भावना दुखावल्या जातील अशा व्हिडीओ ऑडिओ रेकॉडिँग समाज माध्यमांद्वारे प्रसारीत करू नयेत
५ आझाद मैदानात कोणतेही वाहन आणता येणार नाही ६ उपोषण धरणे निदर्शने आंदोलन कार्यक्रमाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच