मुंबई, दि. १८ः सत्तेसाठी आलेली प्रलोभन धुडकावल्याने सूरज चव्हाणला त्रास दिला जातो आहे. तरीही आम्ही सगळेच सत्यासाठी लढत राहू, असा निर्धार शिवसेना (ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी यांनी व्यक्त केला. लोकशाहीसाठी या काळ्या कालखंडाशी ही लढा देऊन विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूरज चव्हाण याला अटक केल्यानंतर ठाकरेंनी एक्सवरून भूमिका मांडली.  

कोरोना काळात वाटप करण्यात आलेल्या कोट्यवधी रूपयांच्यास खिचडी घोटाळ्यात झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय युवा नेते सूरज चव्हाण यांना अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी अटक केली. राज्यातील आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर शिवसेनेने (ठाकरे) मंगळवारी मुंबईत महापत्रकार परिषद घेत टिका केली होती. या परिषदेला चोवीस तासही पूर्ण होत नाही, तोच शिवसेना (ठाकरे) सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईमुळे आदित्य ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. या कारवाईच्याविरोधात आदित्य यांनी गुरुवारी एक्स या समाजमाध्यमावर पोष्ट करत सूरज चव्हाणची पाठराखण केली आहे. तसेच या कारवाईचा निषेध ही केला आहे.

लोकशाही संपवून आपल्या राज्यात मिंध्यांची टोळी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जेवढी घाबरट आणि पोकळ राजवट, तेवढी जास्त त्यांची मस्ती आणि एजन्सीचा वापर होत असल्याचा आरोप करत निर्लज्ज हुकूमशाही आणि त्यांच्या यंत्रणेसमोर न झुकणाऱ्या अशा निष्ठावान व्यक्तीचा सहकारी असण्याचा मला अभिमान आहे. स्वाभिमान, हिंमत, ताकद आणि स्वच्छ मनाचा, सच्चा दिलाचा सूरज आहे, असे कौतुक करत आम्ही सगळेच सत्यासाठी लढत राहू, असा निर्धार ठाकरेंनी व्यक्त केला. सत्तेकडून आलेले प्रलोभनांचे प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावले, त्यामुळे त्यांना अशा प्रकारे त्रास दिला जात आहे. आम्ही लोकशाहीसाठी या काळ्या कालखंडाशी लढा देऊ आणि विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त करत आपल्या राज्यातील हुकूमशाही सत्तेची कृती जग पाहत आहे, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!