मुंबई : राज्यामध्ये पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यामध्ये मतदान सोमवारी पार पडले. मतदानाची टक्केवारी कमी झाली. या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत याला मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत आहे का ? याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिव डॉ. नितिन करीर यांना दिले आहेत.
२० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यात 13 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. यावेळी मुंबईमधील सहा मतदारसंघाचाही समावेश होता. यामध्ये झालेल्या मतदानावेळी मतदारांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. अनेक मतदान केंद्रावर प्रशासनाचा ढिसाळ कारभार बघायला मिळाला. ईव्हीएममध्ये बिघाड, संथ गतीने सुरु असलेले मतदान, उन्हाची तीव्रता अधिक असतानाही मतदान केंद्रात पुरेशा मूलभूत सुविधांचा तुटवडा अशा अनेक समस्यांना मतदारांना सामोरे जावे लागले. मुंबईमधून अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे .
मतदानावेळी झालेल्या गोंधळात वृद्ध मतदारांना रांगेचा तसेच कडक उन्हाचा त्रास मतदारांना सहन करावा लागला. मतदारांना गैरसोयीचा सामोरे जावे लागले. यामुळे मतदानावर झालेला परीणाम या सर्व बाबींची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. यावेळी पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनाने पुरेशी काळजी घेतली नव्हती का? मतदान टक्केवारी कमी का झाली? प्रशासन कुठे कमी पडले? याची तात्काळ चौकशी करावी, असे या आदेशामध्ये सांगितले आहे.