डोंबिवली : डोंबिवली स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाकडून कडक कारवाई सुरू आहे. या कारवाईत सातत्य असल्याने फेरीवाले पुरते हतबल झाले आहेत. गेली नऊ वर्ष फेरीवाला धोरणाची अमंलबजावणी का झाली नाही असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पालिकेला याचा जाब विचारण्यासाठी आज सकाळी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात शेकडो महिला – पुरुष फेरीवाल्यांचा धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियनच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.याबाबत अधिक माहिती देताना युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे म्हणाले, २०१४ पासून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही. फेरीवाल्यांची नोंदणी होऊनही, फेरीवाल्यांचा शासनाच्या नियमानुसार कर्ज उपलब्ध करूनही फेरीवाल्यांना हक्काची बसण्यास जागा नाही. स्टेशन बाहेरील 150 मीटर परिसरात फेरीवाले बसले तर पालिकेडून कारवाई होते. दुसरीकडे नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसण्यास ठरलेले धोरण फक्त कागदावरच आहे. नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी लवकरच टाऊन वेडिंग कमिटी निर्णय घेईल असे अनेक वेळेला आश्वासन देण्यात आले. तसेच राजकीय पुढारी देखील फेरीवाल्यांच्या निर्णयाबाबत केवळ आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करत नाही. जर महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली काढला नाही तर लवकरच शेकडो महिला – पुरुष फेरीवाले पालिकेवर विराट मोर्चा काढून जेलभरो आंदोलन छेडणारा असल्याचे कांबळे यांनी सांगितले.