फडणवीस, पवार की ठाकरे ?
मुंबई : सुप्रीम कोर्टाचा निर्णय लवकरच येणार असून, राज्यातील शिंदे सरकार कोसळणार अशी चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे. त्यामुळे राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण ? अशी चर्चा रंगली असतानाच आता भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे पोस्टर झळकल्याने राजकीय चर्चांना अधिकच रंग चढला आहे. या सगळया चर्चा रंगल्या असतानाच उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कोणालाही मुख्यमंत्री बनवा, आम्ही पाठिंबा देऊ असा प्रस्ताव उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांकडे ठेवल्याचा गौप्यस्फोट बाळासाहेबांच्या शिवसेनेने केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतील बंडखोर आमदार परतीच्या वाटेची चाचपणी करीत असल्याने आमदार पुन्हा शिवसेनेत आल्यास उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतील असा ही अंदाज वर्तविला जात आहे. राज्याच्या राजकारणात पडद्याआड अनेक हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून शिंदे पायउतार होणार का ? पुढचा मुख्यमंत्री फडणवीस, पवार कि ठाकरे कोण होणार ? अशा चर्चांना आता वेग आला आहे.
शिवसेनेला खिंडार पाडीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी भाजपला साथ दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना विराजमान करून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. राज्यातील शिंदे सरकार कोसळणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री पदावर भाजपकडून सातत्याने दावा सांगितला जात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून आमचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहे, असं वारंवार सांगण्यात येत आहे. एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं असताना दुसरीकडे आता नागपूरमध्येही देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार, अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. नागपूर शहरातील बुटीबोरी परिसरात ठिकठिकाणी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार, अशा आशयाचे होर्डिंग्ज लागल्याचं दिसून येत आहे. बुटीबोरी नगर परिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी लावले होर्डिंग्ज सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत.
दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होणार या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. यातच अजित पवार यांची सासरवाडी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावा मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील चौका चौकात तेरचे जावई ,आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आलेत. तसेच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे घातले आहे. आज सकाळी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. अजित पवार यांच्या सासरवाडीत झळकलेल्या या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, एकीकडे राज्यात अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली असतानाच आता दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील, अशा आशयाचे बॅनर नागपुरात लागले आहे. एकच वादा अजितदादा असे फलकही झळकले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्यातील राजकीय समिकरण, परिस्थितीत कशी असेल याचा अंदाज बांधण कठिण असल्याने राजकीय घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी 11 एप्रिलला सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या तीनही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाल्या. या भेटीबाबत शिवसेनेकडून गौप्यस्फोट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे, शरद पवारांना भेटून ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा मागे घेतला, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कोणालाही मुख्यमंत्री बनवा, आम्ही पाठिंबा देऊ, असा प्रस्ताव ठाकरेंनी शरद पवारांना दिला, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. महाराष्ट्रामध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होईल, असा दावाही म्हस्के यांनी केला आहे. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
शिंदे सरकार कोसळणार असल्याच्या चर्चेने शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या आमदारांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे बरोबर गेलेल्या अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे समजते. त्यामुळे अनेक आमदार हे परतीच्या वाटेवर असल्याचेही बोलले जातय. फुटून गेलेले ज्या आमदारांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर टीका केलेली नाही त्या आमदारांसाठी मातोश्रींचे दार उघड असणार आहेत असेही सूत्रांकडून समजतय. त्यामुळे शिवसेनेतील १५ आमदार व्यतिरिक्त इतर आमदार पुन्हा सेनेत आल्यास उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान होतील अशी ही चर्चा आहे. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री फडणवीस, पवार की ठाकरे ? कोण होणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे.