*खर्चाचे ओझे कमी करणाऱ्या सामूहिक विवाहासारख्या उपक्रमांची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
———————————–
*जल संपत्ती नियामक प्रााधिकरणाच्या निर्णयानंतर लगेचच* भावली धरणातून शहापूर परिसरास पाणी*
ठाणे दि 17 सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन ही खूप चांगली कल्पना असून त्यामुळे कुटुंबांवर पडणारे मोठे खर्चाचे ओझे दूर करता येईल, आज विवाह होणाऱ्या आदिवासी जोडप्यांच्या परिवारात आम्हीही नातेवाईक म्हणून सहभागी होऊ शकलो, माझे खूप आशीर्वाद अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1101 जोडप्यांना शुभेच्छा दिल्या . यावेळी त्यांनी भावली धरणातील पाण्यासह शहापूर तालुक्याच्या सर्व समस्या प्राधान्याने दूर करण्यात येतील असेही सांगितले. विवाह सोहळ्यासारखा मंगलमय प्रसंग असल्याने मोठे भाषण करून आपला वेळ घेणार नाही असे सांगून छोटेसे भाषण करून मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
खासदार कपिल पाटील फाऊंडेशन व हिंदू सेवा संघ (महाराष्ट्र) यांच्या सहयोगातून आसनगाव येथे १ हजार एकशे एक आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा आज पार पडला, त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहून आदिवासी जोडप्यांना शुभाशिर्वाद दिल्यामुळे नवविवाहित जोडप्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झालेला दिसत होता.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार कपील पाटील, दिंडोरीचे खासदार हरिशचंद्र चव्हाण, खासदार डॉ विनय सहस्त्रबुद्धे, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, हिंदू सेवा संघाचे काका जगे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आदींची यावेळी उपस्थिती होती. प्रारंभी द्वीप प्रज्वलन करून व शिवछत्रपती, डॉ बाबासाहेब आंबेडकर, शहिद बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
आपल्या भाषणात पुलवामा हल्ल्याचा निषेध करून आपला देश या भ्याड कृत्याचा निश्चित बदला घेईल असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितले
*शहापूर तालुक्याचे सर्व प्रश्न सोडविणार*
भावली धरणातील पाणी शहापूर आणि परिसराला देण्यासंदर्भात सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे, याबाबतीत जल संपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानंतर तातडीने अंमलबजावणी केली जाईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पेसा कायद्यातील काही तरतुदींमुळे आदिवासी- गैर आदिवासींमध्ये विनाकारण वाद होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत
सामूहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम अधिकाधिक व्हावयास हवे. आदिवासी समाजाने जल- जमीन- जंगल खऱ्या अर्थाने टिकविले, आपल्या संस्कृतीचे रक्षण केले. वधु वरांना आपल्या आयुष्यातील विवाहाच्या या मंगलप्रसंगाची खूप उत्सुकता आहे त्यामुळे मी आज फार भाषण करणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विवाह सोहळा सुरू झाल्यावर मुख्यमंत्री आणि व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी विवाह सोहळ्यातील जोडप्यांवर मंगलाष्टका वाहिल्या व सर्वाना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 जोडप्यांना मंगळसूत्र, प्रधानमंत्री उजवला योजनेत गॅस तसेच जिंदाल कंपनीतर्फे संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावली धरणातून लवकरात लवकर शहापूर परिसरास पाणी मिळावे अशी मागणी केली. विदर्भ व मराठवाड्यात देखील सामूहिक विवाहाच्या माध्यमातून अनेक लग्ने लावण्यात आली. शिवसेनाप्रमुखांच्या नावाने कन्यादान योजनेत अनेक गरीब शेतकरी व कुटुंबांना आधार दिल्याचेही ते म्हणाले
शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणामुळे घरी आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसली तरीही लग्नासारख्या सोहळ्यावर कर्ज काढून खर्च करण्याची हौस आदिवासी समाजातील अनेकांसाठी पुढील आयुष्यात अडचणीची ठरली आहे. आयुष्यातील उमेदीची वर्षे लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडण्यात व्यतित केल्याने आर्थिक आघाडीवर अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी अपेक्षित प्रगती साधता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन हिंदू सेवा संघ आणि खा. कपिल पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून या अनोख्या आणि समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन केल्याचे खासदार कपील पाटील म्हणाले