८ ऑगस्ट २०२१ पर्यंत ४३० ग्रामपंचायतीचा गाव कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन
कामे जलदगतीने होण्यासाठी गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान
*ग्रामसेवकासह, सरपंच, स्वच्छता समिती सदस्य, आशा, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण
ठाणे दि.१: ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामीण कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी ऑनलाइन पध्दतीने कृती आराखडा तयार केला जात आहे. या कामाला गती मिळावी यासाठी ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियानही राबविण्यात येत आहे.
प्रत्येक कुटुंबात नळ जोडणी करून मुबलक पाणी मिळावे यासाठी जल जीवन मिशन अभियान राबवले जात आहे. या अभियानाची काटेकोर नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय मुंबई , राज्य पाणी व स्वच्छता मिशन* महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत विभागाच्या सहकार्याने हे आराखडे तयार करून १५ ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये सादर करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. प्रत्येक घरातील नळ कनेक्शनचा आराखडा कसा तयार करावा यासाठी युनिसेफ संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या कोबो टूलची मदत घेतली जात आहे.
यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता) छायादेवी सिसोदे, कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा) . आडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य यांनी सहभाग घेतला.
यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अनिल निचिते, सनियंत्रण व मूल्यमापन तज्ञ अतुल केणे,अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग श्वेता सकपाळ व सूरज देशमुख यांनी गाव कृती आराखडा प्रत्यक्ष कसा भरावयाचे याचे प्रात्यक्षिक करून काही ग्रामपंचायतची ऑनलाईन माहिती भरून घेतली. उपविभाग स्तरावरील अभियंता भास्कर व बनकरी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.तर मनुष्यबळ विकास सल्लागार ज्ञानेश्वर चंदे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच समारोप केलं.
( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram, Twitter, Linkdin आणि YouTube वर नक्की फॉलो करा )