अंधेरीत पाण्याची तीव्र टंचाई : टँकरसाठी महिना ५० हजार रूपये खर्च

लोकप्रतिनिधी अपयशी, नागरिक आंदोलनाच्या तयारीत

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना व सोसायट्यांना पाण्यासाठी खाजगी पाण्याच्यावर टँकर अवलंबून राहवे लागत आहे. पाण्याच्या टँकरसाठी एका एका सोसायटीला महिन्याला तब्बल 50 ते 60 हजार रुपये खर्च करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये पालिकेच्या कारभारा विरोधात संतापाची लाट पसरली आहे. भाजपच्या स्थानिक नगरसेविका रंजना पाटील व आमदार भारती लव्हेकर यांच्याकडे साकडं घालूनही पाणी समस्या सुटत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलीय. येत्या पाण्यासाठी अंधेरीवासिय आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या के पश्चिम विभागावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे उप शाखाप्रमुख सुबोध चिटणीस यांनी दिलाय.

अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई मार्ग, जीवन नगर, सहकार नगर, टेप दर्गा, रामवाडी, आझाद नगर इत्यादी परिसरात 16 ते 17 हजार नागरिक राहतात. या नागरिकांना गेले दोन ते तीन महिने कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या विभागांना सकाळी 5.30 ते 11.30 या वेळेत पाणी पुरवठा केला जात होता. त्यात बदल करण्यात येऊन सकाळी 7. 45 ते 10. 30 या वेळेत पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असताना पाणी पुरवठा करण्याची वेळही कमी केल्याने नागरिकांचे आणखी हाल होऊ लागले आहेत. पालिकेच्या के पश्चिम विभागातील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी पिसाळ यांना घेराव घातला असता आठ दिवसात समस्या सोडवू असे आश्वासन देण्यात आले होते. याबाबत भाजपच्या स्थानिक नगरसेविका रंजना पाटील व आमदार भारती लव्हेकर यांना नागरिकांनी पाण्याची समस्या सोडवण्याची विनंती केली होती. यावर 15 दिवसात पाणी पुरावठा सुरळीत करू असे आश्वासन दिले होते, मात्र आमदार आणि नगरसेविकेला पाणीपुरवठा सुरळीत कऱण्यात अपयश आले आहे. आमदार आणि नगरसेविकेने 15 दिवसाचे आश्वासन दिले होते. 15 दिवस उलटून गेलयानंतरही पाण्याची समस्या सुटलेली नाही. यामुळे आता पाण्यासाठी आंदोलनाशिवाय कुठलाही मार्ग राहिला नसल्याचे चिटणीस यांनी सांगितले. लवकरच पालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा चिटणीस यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!