डोंबिवली, दि. १७ : रस्त्यावरून अस्ताव्यस्तपणे गेलेल्या जलवाहिन्या, त्यातून दररोज हजारो लिटर वाया जाणारे पाणी, त्यामुळे रस्त्यावर १२ महिने साचणारे पाण्याचे तळे, त्यातून वाट काढणारे पादचारी आणि जाणारी वाहने…हे दृश्य कोणत्या ग्रामीण भागातील अथवा झोपडपट्टी परिसरातील नाही. तर हे दृश्य आहे, डोंबिवलीतील अनमोलनगरी या परिसरातील, गेल्या अनेक वर्षापासून इथले नागरिक या समस्येने त्रस्त आहेत.  स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही ही समस्या सोडविण्याची मानसिकता प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये अजूनही दिसून येत नाही. त्यामुळे हे दृश्य पाहिल्यानंतर हीच का स्मार्ट डोंबिवली असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. नवे पालिका आयुक्त म्हणून भाऊसाहेब दांगडे यांनी पदभार स्वीकारलाय, त्यामुळे नवे आयुक्त साहेब तुम्ही तरी लक्ष द्या, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचावाडा अनमोलनगरी परिसरातील रस्त्यावरून गेल्यानंतर हे दृश्य नेहमीच दृष्टीस पडते. या परिसरात मोठया मोठया टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असून, लोकवस्ती मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणात वर्दळ वाढली आहे. जलवाहिनीच्या गळतीमुळे या ठिकाणी बाराही महिने पाण्याचे तळे साचलेले असते. एकिकडे लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहेच, परंतु त्या साचलेल्या पाण्यातून विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जावे लागते. साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भिती आहे. त्यामुळे स्थानिक  नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. लाखो लीटर पाण्याची नासाडी होत असतानाही ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासन डोळयावर पट्टी बांधून बसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

पाण्याची नासाडी थांबवा, अन्यथा उपोषण छेडेन : वामन म्हात्रे यांचा इशारा  

शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यांच्या पाठपुराव्यानंतर पाणी पुरवठा विभागाने रस्ताची खोदाई करून लिकेज काढण्याचा प्रयत्न केला. मात्र लिकेज सापडत नसल्याने गळती कायमच आहे. मात्र प्रशासनाकडून ही बाब गांभिर्याने घेत नसल्याचा संताप वामन म्हात्रे यांनी व्यक्त केला. त्यामुळे त्यांनी आता नवे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना निवेदन देऊन पाण्याची नासाडी राेखण्याची मागणी केली आहे. अन्यथा आजारी असतानाही पालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. एकिकडे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून केले जाते. मात्र दुसरीकडे हजारो लीटर पाणी वाया जात आहे. याकडेही वामन म्हात्रे यांनी लक्ष वेधीत नाराजी व्यक्त केलीय. 

जलकुंभ आणि डीपी रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष  

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीतील सिमेंट रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. डोंबिवली शहराला दिलेल्या निधी विषयी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार . मात्र त्या निधीचा विनियोग चांगल्या कामांसाठी व्हावा अशी अपेक्षा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. तसेच  प्रभाग क्रमांक ५१ मध्ये एकही काम घेतलेल नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीय. मागील दोन वर्षापूर्वी सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असताना प्रभाग क्रमांक ५१ मध्ये पालिकेच्या मालकीच्या जागेवर १५ दशलक्ष लीटरचा जलकुंभ बांधायचा आहे. यासाठी मी पाठपुरवा केला. मात्र तत्कालीन आयुक्तांकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही. या जलकुंभामुळे डोंबिवलीतील १८ भागापैकी ९ प्रभागांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच प्रभागातील ३० मीटर डीपी रस्त्यासाठी पाठपुरावा केला. त्या कामातही आयुक्त, शहर अभियंता यांनी इंटरेस्ट दाखला नाही. त्यामुळे या दोन्ही कामांबाबत आयुक्तांना आदेशीत करण्यात यावे याकडेही माजी ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे लक्ष वेधले आहे. 

———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!